देहूरोडमध्ये २१ किलो गांजासह दोघे गजाआड
देहूरोड :
देहूरोड परिसरात अंमली पदार्थांच्या बेकायदेशीर व्यवहाराने पुन्हा एकदा डोके वर काढले असतानाच गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने निर्णायक कारवाई करत गांजाची मोठी खेप जप्त केली आहे. मामुर्डी येथील एका नामांकित रहिवासी सोसायटीच्या पार्किंगमध्ये गांजाचा सौदा सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी छापा टाकत दोन तरुणांना ताब्यात घेतले. या कारवाईत २१ किलो ३३ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून त्याची बाजारभावानुसार किंमत सुमारे ४ लाख ५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार प्रदीप गोंडाचे यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार ओमकार हरी इंगवले आणि आयुष राजेंद्र भट (दोघे रा. पुणे जिल्हा) यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील किशोर नावाचा आरोपी (रा. मुंबई) फरार असून, त्याच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुंबईहून गांजा घेऊन देहूरोड परिसरात विक्रीसाठी आले होते. मामुर्डीतील एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये ग्राहकांना गांजा वितरित केला जाणार असल्याची खात्रीशीर माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार खंडणीविरोधी पथकाने परिसरात सापळा रचत संशयित वाहनांवर लक्ष ठेवले. ठरलेल्या वेळेत आरोपी घटनास्थळी पोहोचताच पोलिसांनी अचानक छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले. वाहनाची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात गांजा सापडला.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. रहिवासी सोसायटीच्या आवारातच अशा प्रकारचा अंमली पदार्थांचा व्यवहार होणे अत्यंत गंभीर आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली. तरुण पिढी व्यसनाधीनतेच्या गर्तेत जाऊ नये यासाठी कठोर कारवाईबरोबरच जनजागृतीची गरज असल्याचे मतही व्यक्त होत आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास देहूरोड पोलीस करत असून, गांजाच्या पुरवठा साखळीचा छडा लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांची मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.






