तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

 तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयात आज थोर समाजसुधारिका, स्त्री शिक्षणाच्या जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास नवनिर्वाचित नगराध्यक्ष संतोष दाभाडे (पाटील), उपमुख्याधिकारी श्रीमती ममता राठोड यांच्यासह नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर उपस्थितांनी त्यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत सामाजिक परिवर्तनातील त्यांच्या योगदानाची आठवण करून दिली. नगरपरिषद कार्यालयातील वातावरण प्रेरणादायी व भारलेले झाले होते.

Advertisement

यावेळी मार्गदर्शन करताना नगराध्यक्ष संतोष दाभाडे म्हणाले की, सावित्रीबाई फुले यांनी ज्या काळात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, तो काळ अत्यंत प्रतिकूल होता. समाजाकडून विरोध, अवहेलना आणि अन्याय सहन करूनही त्यांनी शिक्षणाची ज्योत विझू दिली नाही. महिलांना शिक्षणाची दारे खुली करून त्यांनी समतेच्या आणि सामाजिक न्यायाच्या लढ्याला नवी दिशा दिली. आजच्या पिढीने त्यांच्या विचारांचा आदर्श घेत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण व विकास पोहोचवण्याचे कार्य करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

नगरपरिषद प्रशासन सावित्रीबाई फुले यांच्या विचारांवर आधारित लोकाभिमुख व समावेशक कामकाज करण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमास भास्कर वाघमारे, रोहित भोसले, आरोग्य निरीक्षक प्रशांत शिवणे, पुरुषोत्तम तेजी, राहुल आगळे यांच्यासह नगरपरिषदेतील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यास अभिवादन करून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्यासाठी कार्यरत राहण्याचा संकल्प केला.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page