काळोखेवाडीत ओढ्यालगतचा रस्ता धोक्याच्या छायेत; प्रशासन उदासीन, नागरिकांमध्ये संताप
तळेगाव दाभाडे :
काळोखेवाडी परिसरातील ओढ्यालगत असलेला अत्यंत वर्दळीचा रस्ता खचल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दैनंदिन वाहतुकीसाठी हा रस्ता जीवनवाहिनी ठरत असून शाळकरी मुले, नोकरदार वर्ग, दुचाकीस्वार तसेच चारचाकी वाहनांची सतत ये-जा असते. मात्र रस्त्याचा काही भाग अचानक खचल्यामुळे कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विशेष बाब म्हणजे ज्या ठिकाणी रस्ता खचला आहे, त्या परिसरापासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर लोकप्रतिनिधींचे निवासस्थान आहे. असे असतानाही या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पावसाळा जवळ येत असताना ओढ्याच्या पाण्याचा प्रवाह वाढल्यास रस्त्याचा आणखी भाग वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वाहतूक पूर्णतः ठप्प होण्याची तसेच जीवितहानी होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे.
स्थानिक नागरिकांनी यासंदर्भात तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र केवळ पाहणी करून आश्वासन देण्यापलीकडे कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. सध्या या ठिकाणी कोणतेही संरक्षक कठडे, सूचना फलक अथवा पर्यायी व्यवस्था नसल्याने अपघाताला आमंत्रण दिले जात असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.
या बाबत बोलताना स्थानिक रहिवासी राहुल काळोखे म्हणाले, हा रस्ता आमच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण या धोकादायक मार्गावरून ये-जा करतात. एखादी दुर्घटना घडल्यावर हालचाल करण्यापेक्षा प्रशासनाने वेळीच जागे होऊन रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी.
दरम्यान, नागरिकांनी तात्काळ दुरुस्ती, मजबूत संरक्षक भिंत उभारणे व कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी लावून धरली आहे. आता नगरपालिका प्रशासन याकडे गांभीर्याने पाहणार का? याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.






