उच्च न्यायालयासाठी वकिली करताना मराठी भाषेवर प्रभूत्व असणे हे बलस्थान – ॲड. मधुकर रामटेके

तळेगाव दाभाडे :

“उच्च न्यायालयातील सर्व कामकाज हे इंग्रजी भाषेत चालते आपले जे काही शेतीसंदर्भातील वा इतर मूळ दस्ताऐवज आहेत ते मराठीत आहेत. येथे कामकाज करणारे ॲड. हे मोठ्या प्रमाणत इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेउन आलेले असल्याने त्यांना मूळ मराठी दस्ताऐवज वाचणे आणि त्यांची मूळातून उकल करणे कठीण जाते. आपले सातबारा, ८ अ, फेरफार, कढईपत्र, इनामी सनदी या मराठीमध्येच आहेत. त्यांचे भाषांतर काय आणि कसे करणार असा प्रश्न उभा राहत असल्याने मूळ दस्ताऐवजांची मराठीमधून उकल करून सांगणे संयुक्तिक ठरते, म्हणून उच्च न्यायालयात वकिली करताना मराठी भाषेवर प्रभूत्व असणे हे बलस्थान आहे.” असे गौरोद्‌गार वडगाव मावळ न्यायालयातील ॲड. मधुकर रामटेके यांनी काढले. नुकत्याच झालेल्या ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडया’च्या निमित्ताने इंद्रायणी महाविद्यालयाच्या मराठी विभागाने आयोजित केलेल्या ‘मराठी भाषा आणि न्यायालयीन कामकाज’ या विषयावर ॲड. रामटेके यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, डॉ. विजयकुमार खंदारे, डॉ. संदीप रतन कांबळे, डॉ. सदाशिव मेंगाळ, प्रा. काशिनाथ अडसूळ, डॉ. मधुकर देशमुख आदी उपस्थित होते

Advertisement

यावेळी मराठी विभागप्रमुख डॉ. विजयकुमार खंदारे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात मराठी विभागाची आजतागायत कशी घोडदौड सुरू आहे, यावर भाष्य करून दि. १४ ने २८ जानेवारी २०२५ दरम्यान विभागाने आयोजित केलेल्या उपक्रमांची माहिती दिली. यात पुस्तक परीक्षण एक कला, सुंदर माझे हस्ताक्षर, सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा आणि मराठी भाषा आणि न्यायालयीन कामकाजात या कार्यक्रमांचा सहभाग असल्याचे सांगितले.

पुढे बोलताना ॲड. रामटेके म्हणाले, “न्यायालयीन कामकाज करताना न्यायालयात वापरले जाणारे मराठी शब्द, त्यातून निर्माण झालेले विपर्यास यावरही त्यांनी सप्रमाण भाष्य केले. तसेच खालच्या कोर्टात मात्र मराठी भाषेत न्यायदान केले जाते. त्याचे कागदपत्रे, निकाल मराठीमध्ये उपलब्ध आहेत सर्वोच्च न्यालयाने महत्त्वाचे खटले आणि त्यांचे निकालपत्र मराठीत उपलब्ध करून द्यायला सुरूवात केली आहे, यावरही त्यांनी सुतोवाच केला. भारतीय कायदे आणि लॉर्ड मेकॉले याने तयार केलेले ‘इंडियन पिनल कोड’पासूनचा प्रवास त्यांनी सांगितला तसेच विद्यार्थ्यांना विशेषत महिलांच्या संदर्भातील ९७ ते ११६ कलमाची थोडक्यात माहिती दिली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी अध्यक्षीय भाषाणात मराठी भाषा आणि शिक्षण, समाज, राजकारण, न्यायव्यवस्था यांचा सहसंबंध अधोरेखित केला. फारसी, उर्दू, इंग्रजी कायद्यांचा ॲड. रामटेके यांनी केलेल्या उल्लेखासंदर्भात विशेष भाष्य करून न्यायालयातील मराठी भाषेचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले.

प्रा डॉ संदीप कांबळे यानी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर प्रा सुरेश देवढे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page