*तळेगावला आंद्रा धरणातून पाईपलाईनने पाणी देण्याबाबत त्वरित अहवाल द्या – अजित पवार*
तळेगाव दाभाडे, 8 ऑगस्ट –
तळेगाव दाभाडे शहराला आंद्रा बंद जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करण्याबाबत एमआयडीसी व जलसंपदा विभागाने त्वरित अहवाल तयार करावा, असा आदेश उपमुख्यमंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी (बुधवार दि.७) रोजी दिले.
तळेगाव दाभाडे शहरातील सर्वांना भेडसावणारा प्रश्न तळेगाव-चाकण रस्ता आणि स्टेशन भागात होत असणारा अशुद्ध व अपुरा पाणीपुरवठा या संदर्भात आमदार सुनिल शेळके व तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, सुरेश धोत्रे, कृष्णा कारके तसेच माजी नगरसेवक अशोक भेगडे, सुदर्शन खांडगे, रामभाऊ गवारे यांनी मंत्रालयात जाऊन अजित पवार यांची भेट घेतली व त्यांना समस्यांविषयी सविस्तर माहिती दिली.
तळेगाव शहराला पवना व इंद्रायणी या दोन नद्यांचे पाणी पुरविण्यात येते. तळेगाव स्टेशन विभागाला मुख्यतः इंद्रायणी नदीचे पाणी पुरविले जाते, मात्र गेले काही दिवस अशुद्ध व अपुरा पाणीपुरवठा होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून पुढील 50 वर्षांचा विचार करून या लोकसंख्येला पुरेसे पाणी देण्याबाबत नियोजन होण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी आमदार शेळके यांनी केली.
धरणातून सोडलेले पाणी नदीतून शहरापर्यंत येईपर्यंत ते प्रदूषित होते तसेच मोठ्या प्रमाणात वायाही जातो. त्यामुळे तळेगाव दाभाडे शहराला आंद्रा धरणातून बंद जलवाहिनीद्वारे पाणी देण्यासाठी संबंधित एमआयडीसी व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ अहवाल तयार करावा, असे निर्देश अजितदादांनी दिले.
“तळेगावला आंद्रा धरणातून बंद पाईपलाईनद्वारे पाणी उपलब्ध झाल्यास शहराला पाण्याचा तिसरा स्रोत मिळणार आहे.दादांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने या कामाला लवकरच गती मिळुन शहराला स्वच्छ,मुबलक पाणी पुरवठा होईल,”असा विश्वास आमदार सुनिल शेळके यांनी व्यक्त केला.