तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची मंजूर विकास कामे, मंजूर विकास आराखड्याप्रमाणेच करावीत – किशोर भेगडे
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे शहराचा विकास आराखडा मंजूर असून तळेगाव नगर परिषदेने त्यानुसार विकास कामे करणे अपेक्षित आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीतील जिजामाता चौक ते सुभाष चौक ते शाळा चौक ते गणपती चौक, खडक मोहल्ला चौक, राजेंद्र चौक बाजारपेठ मार्गे तेली आळी चौक ते मारुती मंदिर चौकापर्यंत रस्ता रुंदीकरणाचा ठराव नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत पारित झालेला आहे. मंजूर विकास आराखड्यानुसार नऊ मीटरचा रस्ता रुंदीकरण करून पावसाळी पाण्यासाठी बंदिस्त गटार,पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन, भूमिगत विजेच्या तारा विजेचे पोल शिफ्ट करणे, इत्यादी नागरी हिताची कामे करायला पाहिजे होती ती कामे नगरपरिषद प्रशासन करताना दिसत नाही. बाजारपेठ रुंदीकरणासाठी नागरिक स्वतःच्या जागा नगर परिषदेकडे हस्तांतरित करण्यासाठी तयार आहेत. त्या संदर्भात नगर परिषदेमध्ये मीटिंग झाली आहे रस्ता रुंदीकरणासाठी बाधित होणाऱ्या प्रत्येक मिळकतीचा सर्वे करून त्यानुसार प्रत्येक मिळकत किती फूट मागे घेऊन तोडावी लागेल ती बाधित होणारे इमारत मातीची लाकडाची किंवा स्टील किंवा सिमेंटची आहे यावरून त्या इमारतीला किती नुकसान भरपाई मिळेल तसेच त्याला किती एफएसआय किंवा टीडीआर मिळेल हे ठरवून सुद्धा नगरपरिषद प्रशासन त्यानुसार काम करत नाही.
सध्या जिजामाता चौक ते सुभाष चौक शाळा चौक ते गणपती चौकापर्यंत पावसाळी भूमिगत गटाराचे काम चालू असून त्या ठिकाणी नऊ मीटरचा रस्ता अस्तित्वात नाही ( विकास आराखड्याप्रमाणे ) सदर भूमिगत गटार करताना सोलिंग ग्राऊटिंग पीसीसी केलेले नाही तसेच ती कामे करताना नगरपरिषद च्या बांधकाम अभियंत्याने बांधकाम दर्जाचा अहवाल नोंदवलेला नाही. यामध्ये करदात्या नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी चालू आहे. चालू असणारी कामे ती शाश्वत व दर्जेदार नाही तरी प्रशासनाने ठेकेदारांचा विचार न करता नागरिकांच्या हिताचा विचार करून मंजूर विकास आराखड्याप्रमाणे नऊ मीटरचा रस्ता रुंद करून नंतरच विकास कामे करावे अशी मागणी किशोर छबुराव भेगडे यांनी तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.