उद्याच्या पिढीला जाती-धर्माच्या जंजाळात अडकवू नका : संजय आवटे
तळेगाव दाभाडे, दि. २८ :
बदलत्या जगात उद्याच्या पिढ्यांना फुलता यावे, असे वातावरण तयार करण्याची गरज आहे. मुलांना जाती धर्माच्या जंजाळात न अडकवता सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर अशा विचारवंतांचा वारसा समजून सांगितला पाहिजे. मुलांना अश्रूचे महत्त्व, संवेदनशीलता शिकवा, तसेच आपले विचार मुलांवर न लादता त्यांना करिअर स्वातंत्र्य दिले, तरच उद्याची पिढी फुलणार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी केले.
इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या वतीने आयोजित मावळभूषण कृष्णराव भेगडे व्याख्यानमालेचा समारोप संजय आवटे यांच्या ”चला उभारू नवी पिढी’ या विषयावरील व्याख्यानाने झाला. दरम्यान, पर्यावरण संवर्धनात केलेल्या कार्याबद्दल अलोक काळे यांना, तर पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल पं. सुरेश साखवळकर यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. समारोपाच्या अध्यक्षस्थानी माजी विभागीय आयुक्त दिलीप बंड होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, खजिनदार शैलेश शहा, उद्योजक संजय साने, परेश पारेख, राजेश म्हस्के, निरूपा कानिटकर, नंदकुमार शेलार, प्राचार्य व संयोजक डॉ. संभाजी मलघे, विलास काळोखे आदी उपस्थित होते.
संजय आवटे म्हणाले, की आपण आजोबांच्या खांद्यावर उभे आहोत, म्हणून आपल्याला जग दिसते, हे नवीन पिढीने लक्षात घ्यावे. आपली स्वतंत्र ओळख निर्माण करा. जुन्या पिढीला माध्यम कळत नाहीत, पण ती माध्यमांसोबत जगत आली. बदलता भारत नव्या पिढीला समजून सांगण्याची गरज आहे. हे काम प्रत्येक आईने करावे. विद्यार्थ्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे, की आपण तोपर्यंत हरत नाही जोपर्यंत मनाने हार स्वीकारलेली असते. तुम्ही वेगळे करियर निवडण्याचा प्रयत्न करता, तेव्हा लोक नावे ठेवतात. पण तुम्हाला जे हवे ते केले पाहिजे. तुम्हाला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, हे निश्चित झाल्यावर प्रसंगी आई-वडिलांशीही बंड करा. आता गरीब श्रीमंत असा भेदभाव राहिलेला नाही. यश मिळवण्याची सर्वांना समान संधी आहे. त्यासाठी पालक व शिक्षकांनी जबाबदारी स्वीकारत विद्यार्थ्यांना बळ देण्याची गरज आहे.
आवटे पुढे म्हणाले, पालकांनी मुलांवर आपले विचार लागू नयेत. मुलांना हवं ते करू द्या. तुमची मुलं माणूस झाली पाहिजेत. मुलांना करिअर करताना जाती-धर्माच्या पलीकडचा लढा समजून सांगा. आपल्याला माणूस म्हणून खूप काम करावे लागणार आहे. एवढे कष्ट करा की समाज तुम्हाला पहिल्या रांगेत बसवेल. इतिहासात डोकावलं तर लक्षात येते, की अनेकांना रेल्वेतून ढकलले गेले; पण महात्मा गांधींना हे माहीत होते, मला काय करायचं आहे, म्हणून ते महात्मा झाले. सरकारकडून अपेक्षा न ठेवता शिक्षक व पालकांनी मुलांशी संवाद साधत समन्वय ठेवायला हवा. हा काळ असा आहे की संवादाची सर्व साधने असतानाही विसंवाद वाढत चाललेला आहे. सुंदर भारत घडवायचा असेल, तर तुम्ही कुठल्या मूल्यांसोबत आहात, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
दिलीप बंड म्हणाले, कुठलेही क्षेत्र वाईट नाही. फक्त संधी शोधता यायला हवी. आहे त्यावर समाधानी न राहता भरपूर अभ्यास करून करिअरमध्ये यशस्वी झाले पाहिजे.
शैलेश शाह यांनी प्रास्ताविक, दीप्ती कन्हेरीकर व प्रा. सत्यजीत खांडगे यांनी सूत्रसंचालन, तर आभार निरूपा कानिटकर यांनी मानले.