तळेगावात चोरट्यांचे राज्य; देवही असुरक्षित, दिवसाढवळ्या गणपती मंदिरातील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न.

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :शहरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून आता शहरातील मंदिरे सुद्धा सुरक्षित राहिलेली नाहीत. तुळजाभवानी मंदिरातील चांदीचा मुकुट चोरीला गेल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी पुन्हा एकदा दिवसाढवळ्या गणपती मंदिरातील दानपेटी फोडण्याचा निर्लज्ज प्रकार उघडकीस आला. मात्र, नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आणि चोरट्याचा डाव उधळला गेला.

 

गणपती चौकातील श्री गणपती मंदिरात सकाळी सुमारे ९ वाजून १० मिनिटांच्या सुमारास हा संतापजनक प्रकार घडला. मंदिरात भाविकांची वर्दळ सुरू असतानाच एका संशयित इसमाने थेट दानपेटीवर डल्ला मारत ती फोडण्याचा प्रयत्न सुरू केला. भरदिवसा मंदिरात घुसून दानपेटी फोडण्याचे धाडस होत असल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

Advertisement

 

मात्र, मंदिरातील कर्मचाऱ्यांच्या आणि उपस्थित नागरिकांच्या सतर्क नजरेतून हा प्रकार सुटला नाही. नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत त्या चोरट्याला जागीच पकडून चांगलाच चोप दिल्यानंतर पोलिसांच्या हवाली केले. वेळेत कारवाई झाल्याने दानपेटीतील भाविकांचे अर्पण सुरक्षित आहे . असाच प्रकार पंधरा दिवसापूर्वी गाव भागातील मरी माता मंदिरात पहाटेच्या सुमारास घडला होता मात्र मंदिरातील पुजाऱ्यामुळे चोराचा डाव फसला

 

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच तुळजाभवानी मंदिरातील देवीचा मौल्यवान चांदीचा मुकुट चोरीला गेल्याने शहर हादरले होते. त्या प्रकरणाचा तपास अद्याप धुळखात पडलेला असतानाच पुन्हा मंदिरावरच चोरट्यांनी हल्ला चढवल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

चोरांना पोलिसांचा धाक उरलेलाच नाही का? असा संतप्त सवाल भाविक व नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शहरातील मंदिर परिसर, बाजारपेठा आणि चौकांमध्ये पोलिसांची गस्त केवळ नावालाच असल्याची टीका होत आहे. तळेगावातील धार्मिक स्थळांना तातडीने पोलीस संरक्षण द्यावे, गस्त वाढवावी आणि चोरट्यांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी आक्रमक मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page