तुमच्यासाठी राजकुमार आणून देण्याची हिंमत तुमच्या बापात निश्चित आहे : वसंत हंकारे

तळेगाव दाभाडे, दि. २७ :

मी आंतरजातीय विवाहाच्या विरोधात नाही, परंतु शालेय किंवा महाविद्यालयीन जीवनात सोशल मीडियावरील मैत्रीला भुलून वाईट मार्गाला जाऊन आई – बापाची मान खाली जाईल, असे वर्तन करू नका. चांगलं शिक्षण घेऊन मोठे व्हा. तुमच्यासाठी राजकुमार आणून देण्याची हिंमत तुमच्या बापात निश्चित आहे, असे आवाहन व्याख्याते वसंत हंकारे यांनी मुलींना केले. दरम्यान, त्यांचे व्याख्यान ऐकून उपस्थित सर्वच भावूक झाले.

इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना ‘बाप समजून घेताना’ या विषयावर वसंत हुंकारे बोलत होते. दरम्यान, ज्येष्ठ ऑलिम्पिकपटू मारुती आडकर यांचा संस्थेच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, गोरखभाऊ काळोखे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, निरूपा कानिटकर, विलास काळोखे, संदीप काकडे, युवराज काकडे,  प्राचार्य डॉ. संभाजी मलघे आदिंसह पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

हंकारे म्हणाले, की ही छत्रपती शिवाजी महाराज, गौतम बुद्ध, महावीर, संत गाडगेबाबा, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संतांची भूमी आहे. या भूमीत मुलगी सुरक्षित राहील, याची जबाबदारी आपली आहे. मुला-मुलींनी आपल्यामुळे आपल्या बापाची मान खाली जाईल, असे वागू नये. बापाला मेल्यावर जाळतात हे चूक आहे. कारण तुमच्या वाईट वागणुकीमुळे बापाची मान खाली जाते, तेव्हाच बाप खऱ्या अर्थाने मेलेला असतो. बाप ऊन, वारा, पावसात कितीही कष्ट उपसेल पण मुलांना काही कमी पडू देणार नाही. मोबाईलसारख्या भौतिक गोष्टीसाठी मुलं आत्महत्या करतात, तेव्हा बाप उन्मळून पडतो. त्यामुळे मन जपून बापाला समजून घेणे आवश्यक आहे.

Advertisement

हंकारे पुढे म्हणाले, की मुलींनी कोणताही निर्णय घेताना, आईवडिलांनंतर आलेल्या व्यक्तीचं तुम्ही जेवढं ऐकून घेतात, त्यापेक्षाही कमी प्रमाणात का असेना आपल्या आईवडिलांचंही मत कोणताही मोठा निर्णय घेताना विचारात घ्या. तो बाप जो फाटलेले कपडे घालतो, वर्षानुवर्ष एकच चप्पल वापरतो, पण तुम्हाला ब्रॅण्डेड कपडे, शूज आणून देतो, त्यात उधार उसनवारी करतो, कर्ज काढतो, हे तो चेहऱ्यावर कधीच दिसू देत नाही, ही कला त्याला मुलीचा बाप झाल्यापासून अवगत झालेली असते. बापाच्या मनात कितीही डोकवा त्याच्या मनातलं दु:ख तो तुम्हाला कधीच दिसू देत नाही. पापाची परी असं म्हणून तुम्ही कितीही बाप आणि मुलीच्या नात्याची मस्करी केली, तरी बाप झाल्यावर बापासाठी मुलगी ही परीच्याही पुढे असते. लहान असताना आई किंवा कोणीही मारले तर बापाची वाट पाहत अंगनात थांबायचो आणि बाप आला की त्याला कडाडून मीठी मारत मारत तक्रार सांगायचो. मात्र, कालांतराने आपण जसजसे मोठे झालो तसतसे बापाला आणि आईला दुरावत चाललो. परिणामी लहानपणी आवडणारा आपला सुपरहिरो बाप कधीचाच विसरलो.

प्रास्ताविक प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी, सूत्रसंचालन दीप्ती कन्हेरीकर व प्रा. सत्यजीत खांडगे यांनी, तर आभार संदीप काकडे यांनी मानले.

घरी गेल्यावर बापाला कडाडून मिठी मारा..!

आज बापाला मिठी मारने तर दूरच आपण त्यांच्यासोबत नीट बोलत सुध्दा नाही. म्हणून आज ऐवढे करा, घरी गेल्यावर बाप किंवा आईला कडाडून मिठी मारा ! तो पुन्हा तसाच लहानपणी सारखा तुम्हाला विचारेल काय झालं माझ्या पिल्ला… तुम्ही नक्की सांगा, ‘लहानपणी असणारा माझा सुपरहिरो बाप मला आज पुन्हा कळला म्हणून मी मीठी मारली बाबा..! बघा त्यांच्या डोळ्याच्या कडा ओलावतात की नाही.

अनाथांकडून शिका आई-वडिलांची किंमत काय असते..!

ज्या आई-वडिलांनी २० वर्षे मुलींचा संभाळ केला त्या मुलं मुली दोन दिवसांच्या प्रेमा खातर आई-वडिलांना विसरून जातात. आई-वडिलांना विसरू नका. अनाथाकडून जाणून घ्या आई-वडिलांची किंमत काय असते. बाप असता तर माझेही लाड झाले असते, असे या मुलांना वाटून जाते. म्हणून आई वडिलांचा आदर करा. व्यसन करू नका, वाम मार्ग पत्करू नका. आई – बापाचा अपमान करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page