तळेगाव दाभाडे नगर परिषदेकडून, “स्वाक्षरी वरून स्वभाव दर्शन” या कार्यक्रमाचे आयोजन
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे नगरपरिषद व साहित्य कला आणि संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा 2025 ( १४ जानेवारी ते २८ जानेवारी २०२५ )या उपक्रमांतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने कर्मचार्यांसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी सुवाच्च लेखन व शुद्ध लेखन स्पर्धा आयोजित केल्या आहेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी सुप्रसिद्ध साहित्यिक व हस्ताक्षरतज्ञ डॉ. मधुसूदन घाणेकर यांचे “स्वाक्षरी वरून स्वभाव दर्शन” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी माननीय श्री विजयकुमार सरनाईक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मराठी भाषेची सुरुवात, तिचा उगम आणि संवर्धनाची आवश्यकता याबाबत साहित्य,कला आणि सांस्कृतिक मंडळाचे विश्वस्त श्री. शैलेश मखामले यांनी उपस्थितांना विस्तृत स्वरूपात माहिती दिली. मानवी जीवनातील हस्ताक्षराचे महत्व विषद करताना विनोदपूर्ण शैलीमध्ये उपस्थितांना डॉक्टर मधुसूदन घाणेकर यांनी मार्गदर्शन केले. स्वाक्षरी व हस्ताक्षर यांचे महत्व समजून सांगताना त्यांनी उपस्थितांच्या स्वाक्षरी तपासून त्यांच्या स्वभावाचे विविध पैलू उपस्थितांसमोर उघड केले. त्याचप्रमाणे हस्ताक्षारामध्ये सुधारणा करण्यासाठी आवश्यक गोष्टीसुद्धा सांगितल्या. हलकेफुलके परंतु मार्मिक विनोदपूर्ण शैलीत साकारलेल्या या एकपात्रीसमान कार्यक्रमाचे उपस्थितांनी दाद देऊन रसग्रहण केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्रतिभा काळे व सौ.सायली जाधव यांनी केले तर आभारप्रदर्शन मा.उपमुख्याधिकारी श्रीमती. ममता राठोड यांनी केले. कार्यक्रमादरम्यान मोठ्या संख्येने नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी शिक्षक व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महिला व बालकल्याण विभाग अधिकारी सौ.अर्चना काळे तसेच भांडार विभाग प्रमुख श्री.सिद्धेश्वर महाजन, कर्मचारी रोहित आगळे तसेच साहित्य कला आणि सांस्कृतिक मंडळाच्या कार्यकारिणी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. सदर मराठी भाषा संवर्धन पंधरवडा 2025 चा समारोप २८ जानेवारी रोजी प्रसिद्ध विचारवंत व व्याख्याते मा.श्री.उल्हासदादा पवार यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे नगरपालिका प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.