स्वयंशिस्तीची जाणीव राष्ट्रीय सेवा योजनेतून – एड. रवींद्र पोमणे
तळेगाव दाभाडे :
विद्यार्थ्यांना जगण्यातील स्वयंशिस्त राष्ट्रीय सेवा योजनेतून शिकवणे सोपे असते तसेच सामाजिक बांधिलकीतून होणारे काम राष्ट्रीय सेवा योजनेतून मोठ्या प्रमाणावर समाजापर्यंत पोहोचले असल्याचे मत एडवोकेट रवींद्र पोमणे यांनी व्यक्त केले. इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिनाच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, उपप्राचार्य प्रा. एस पी भोसले, प्रा. के.डी. जाधव, प्राध्यापक यु एस खाडे प्रा. हुलावळे तसेच मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एस पी भोसले यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजनेतून विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्व विकास हातभार लावावा तसेच शिस्त आणि गुणवत्तेच्या जोरावर विद्यार्थ्यांनी आपले वैयक्तिक आयुष्य व उद्याचे भविष्य उज्वल करावे असे सांगितले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे म्हणाले की, उद्याची महासत्ता होऊ घातलेला भारत हा तरुणाईचा देश म्हणून ओळखला जातोm याच तरुणाईला महाविद्यालयीन जीवनात शिस्तीचे धडे राष्ट्रीय सेवा योजनेतून मिळत असतात. आज मोठ्या प्रमाणावर समाजोपयोगी काम राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून उभे राहिले आहे आणि विद्यार्थी हाच त्याचा पाया आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आपला सक्रिय सहभाग चांगल्या समाज निर्मितीसाठी द्यावा असे डॉ. मलघे म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. राजाराम ढोके यांनी केले तर कार्यक्रमाधिकारी प्रा. शिवाजी जगताप यांनी आभार मानले.