श्री शिवशंभू तीर्थ लोकार्पण सोहळा २० ऑक्टोबर रोजी संपन्न होणार
तळेगाव दाभाडे :हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या स्मारकाचा भव्य श्री शिवशंभू तीर्थ लोकार्पण सोहळा सोमवार, दि. २० ऑक्टोबर २०२५ रोजी सायं. ४ वाजता तळेगाव दाभाडे नगरपरिषदेसमोरील शिवशंभू तीर्थ मैदानावर संपन्न होणार आहे.
या ऐतिहासिक सोहळ्याचे उद्घाटन परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरी जी महाराज (कोषाध्यक्ष, श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र, अयोध्या) यांच्या शुभहस्ते होणार आहे. या प्रसंगी अनेक मान्यवर, लोकप्रतिनिधी, समाजसेवक आणि हजारो शिवप्रेमी उपस्थित राहणार आहेत.
शिवशंभू तीर्थ समिती, तळेगाव दाभाडे यांच्या वतीने या भव्य स्मारकाची उभारणी करण्यात आली आहे. या स्मारकातून छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या अदम्य शौर्य, पराक्रम आणि राष्ट्रनिष्ठेचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे शहरात सध्या उत्साहाचे वातावरण आहे. परिसरात सजावट, प्रकाशयोजना आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या तयारीला जोर आला असून स्थानिक नागरिक या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आतुर आहेत.
या लोकार्पण सोहळ्याचे सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम शिवशंभू तीर्थ समितीच्या आयोजनाखाली पार पडतील. समितीने नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अभिमानास्पद क्षणाचा भाग व्हावे.






