तळेगाव दाभाडे ग्रामदैवत उत्सवाची जय्यत तयारी पाच दिवस भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडेचे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज यांच्या वार्षिक उत्सवास येत्या रविवारपासून (दि.३०) सुरुवात होत आहे. सलग पाच दिवस धार्मिक आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष अविष्कार भेगडे आणि प्रसिद्धीप्रमुख अभिषेक बुट्टे यांनी दिली.
उत्सवाची सुरुवात रविवारी (दि.३०) पहाटे महाअभिषेकाने होणार आहे. संध्याकाळी छबिना पालखी मिरवणूक निघेल. त्यानंतर घोरावाडी स्टेशन मैदानात मंगला बनसोडे आणि नितीनकुमार बनसोडे करवडीकर यांचा लोकनाट्य तमाशा रंगणार आहे. तसेच श्री डोळसनाथ महाराज मंदिर प्रांगणात भजनी भारुडाचा कार्यक्रम होईल.
रविवार आणि सोमवार (दि.३० व ३१) गणपती माळ येथे बैलगाडा शर्यत होणार आहे. या शर्यतीसाठी मोठी बक्षीस रक्कम जाहीर करण्यात आली आहे.
प्रथम क्रमांक: ₹1,25,000
द्वितीय क्रमांक: ₹1,00,000
तृतीय क्रमांक: ₹75,000
चतुर्थ क्रमांक: ₹51,000
याशिवाय टू-व्हीलर, LCD टीव्ही, कुलर, चांदीची गदा, चषक, ट्रॉफी आदी बक्षिसे देखील असतील.
मंगळवारी (दि.१) दुपारी ३ ते रात्री ७ वाजेपर्यंत भोईआळी मळा येथे निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान भरवले जाणार आहे. या कुस्त्यांसाठी एकूण ₹8,08,888 इनाम रक्कम ठेवण्यात आली आहे. रोख बक्षिसांसह चांदीची गदा, चषक, ट्रॉफी दिल्या जाणार आहेत. देशभरातील नामांकित मल्ल या आखाड्यात उतरतील.
बुधवारी (दि.२) रात्री ८ वाजता मारुती मंदिर चौक (डी.पी. रोड) येथे लावणी सम्राज्ञी, सिनेतारका राधा पाटील (मुंबई) यांचा सेलिब्रिटी शो रंगणार आहे.
गुरुवारी (दि.३) रात्री ८ वाजता संदीप कर्नावट निर्मित व दिग्दर्शित ‘ऑर्केस्ट्रा ऑल द बेस्ट’ हा मनोरंजनाचा कार्यक्रम श्री डोळसनाथ महाराज मंदिराच्या प्रांगणात होणार आहे.
उत्सव समितीने ग्रामस्थ व भाविकांना या कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.