सेजल मोईकर सलग तिसऱ्यांदा ‘स्ट्रॉंग वुमन ऑफ महाराष्ट्र’ राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड, सुवर्णपदकांसह बेस्ट लिफ्टरचा किताबही पटकावला

SHARE NOW

माळवाडी :

 

 

एमजी फिटनेस, माळवाडी येथील खेळाडू सेजल मोईकर हिने आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर सलग तिसऱ्यांदा ‘स्ट्रॉंग वुमन ऑफ महाराष्ट्र’ हा मानाचा किताब पटकावत क्रीडा क्षेत्रात नवा इतिहास रचला आहे.

28 ते 30 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वडाळा येथे झालेल्या राज्यस्तरीय बेंच प्रेस स्पर्धेत सेजल हिने 76 किलो वजन गटात तब्बल 120 किलो वजन उचलून सुवर्णपदक मिळवले. या यशासह तिला ‘स्ट्रॉंग वुमन ऑफ महाराष्ट्र’ हा किताब प्रदान करण्यात आला. या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीमुळे तिची 7 ते 11 जानेवारी 2026 रोजी हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

 

Advertisement

तसेच 9 व 10 डिसेंबर रोजी चंद्ररूप ढाकणे जैन कॉलेज, श्रीरामपूर येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरविभागीय पावरलिफ्टिंग स्पर्धेत सेजल हिने 76 किलो वजन गटात एकूण 495 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. याच स्पर्धेत तिला ‘बेस्ट लिफ्टर’ चा बहुमानही मिळाला.

यानंतर 19 ते 21 डिसेंबर 2025 दरम्यान इंदौर येथे झालेल्या वेस्ट झोन राष्ट्रीय क्लासिक पावरलिफ्टिंग स्पर्धेत सेजल हिने 76 किलो वजन गटात (ज्युनियर) 380 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले. याचबरोबर तिला ‘स्ट्रॉंग वुमन ऑफ वेस्ट झोन’ हा किताबही बहाल करण्यात आला.

सेजल मोईकर ही शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रशिक्षक नितीन म्हाळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने सराव करत आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल क्रीडा क्षेत्रातून सर्वत्र कौतुक होत आहे.

दरम्यान, ग्रामपंचायत माळवाडी यांच्यावतीने सेजल मोईकर हिला पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या असून तिच्या यशाचा गावाला अभिमान असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page