आरक्षित भूखंडावर कचऱ्याचे साम्राज्य. तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची डोळेझाक

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीतील माळवाडी सीमेवर असलेल्या मधुबन साई सिटी परिसरात आरक्षित भूखंडावर कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले असून नगरपरिषद प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या जागेचे अक्षरशः कचरा डेपोमध्ये रूपांतर झाले आहे. शॉपिंग सेंटर व भाजी मंडईसाठी आरक्षित असलेला सुमारे पंधरा हजार चौरस फूट क्षेत्रफळाचा हा भूखंड सध्या राडारोडा व घरगुती कचऱ्याने व्यापलेला दिसून येत आहे.

तळेगाव स्टेशन परिसरासह शहरातील विविध भागांतून ट्रॅक्टरद्वारे कचरा आणून या ठिकाणी सर्रास टाकला जात आहे. परिणामी, संपूर्ण परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे जगणे अवघड झाले आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे डास, माश्यांचा प्रादुर्भाव वाढला असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व महिला यांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात येथे पाणी साचून साथीचे आजार पसरण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

Advertisement

महत्त्वाचे म्हणजे हा भूखंड सार्वजनिक उपयोगासाठी आरक्षित असताना त्याच्या संरक्षणासाठी कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. ना संरक्षक कुंपण, ना सूचनाफलक, ना नियमित पाहणी. त्यामुळे कचरा टाकणाऱ्यांचे फावले असून बिनधास्तपणे या जागेवर अतिक्रमण होत आहे. नगरपरिषदेच्या निष्काळजीपणामुळेच हा प्रकार दिवसेंदिवस गंभीर बनत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.

सामाजिक कार्यकर्ते दिलीप डोळस यांनी या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. “हा भूखंड तातडीने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करून येथे कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करणे आवश्यक आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बसवून दंडात्मक कारवाई केल्याशिवाय हा प्रकार थांबणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.अनेक लोकांनी बेकायदेशीर झोपड्या उभारून अतिक्रमण करून परिसर गलिच्छ केला आहे.प्रशासनाने यावर त्वरित कारवाई करावी

दरम्यान, नगरपरिषद प्रशासन याकडे कधी लक्ष देणार, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. आरक्षित भूखंडाचे संरक्षण करून तो मूळ उद्देशासाठी विकसित करावा, तसेच तातडीने स्वच्छता मोहीम राबवावी, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. आता प्रशासन केवळ पाहत राहणार की ठोस पावले उचलणार, याकडे संपूर्ण तळेगावचे लक्ष लागले आहे.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page