मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाची मासिक बैठक चांदखेड येथे उत्साहात संपन्न स्पर्श हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्य शिबीराचेही आयोजन
तळेगाव दाभाडे:
मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाची मासिक बैठक शनिवारी (दि.३) श्री संत रामजीबाबा मंदिर, चांदखेड, मावळ येथे अतिशय उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी स्पर्श हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. अमित वाघ व त्यांच्या संपूर्ण स्टाफ आणि मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली देण्यात आली. या बैठकीसाठी मंडळाचे अनेक पदाधिकारी व वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीचे आयोजन व संपूर्ण नियोजन हे मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाचे पवन मावळ विभाग प्रमुख ह.भ.प. संजय महाराज बांदल यांनी केले होते.
श्री विठ्ठलाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व पूजन करून या बैठकीला सुरूवात करण्यात आली. सर्वप्रथम मंडळाचे भजन संपन्न झाले. यावेळी मंडळाच्या अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी सरपंच मीनाताई माळी, मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. नंदकुमार महाराज भसे, सुवर्णाताई घोटकुले, संजय महाराज बांदल, गोपीचंद महाराज कचरे, सोनालीताई शेलार या मान्यवरांच्या हस्ते आरोग्य शिबीराचे उद्घाटन संपन्न झाले. याप्रसंगी अनेक वारकरी बंधू भागिनींनी आरोग्य शिबीराचा लाभ घेतला.
या बैठकीसाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी मंडळ राबवत असलेल्या अनेक सामाजिक, धार्मिक व आध्यात्मिक उपक्रमांचे विशेष कौतुक केले. तसेच मंडळाच्या पुढील वाटचालीसाठी आपल्या शुभेच्छा व सदिच्छा व्यक्त केल्या.
यानंतर मंडळाचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. नंदकुमार महाराज भसे यांनी उपस्थित वारकरी बांधवांना विशेष मार्गदर्शन केले व मंडळाचे कार्य आणि भविष्यातील वाटचाल यांविषयी चर्चा केली.
या संपूर्ण बैठकीचे आयोजन, संपूर्ण व्यवस्था व स्नेहभोजनाची व्यवस्था यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल सर्वांनी ह.भ.प. संजय महाराज बांदल यांचे विशेष कौतुक केले. शेवटी पसायदानाने या बैठकीची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे सचिव रामदास पडवळ यांनी केले. सूत्रसंचालन रोहिदास घारे यांनी केले. विश्वस्त बजरंग घारे यांनी आभार मानले.
या बैठकीसाठी मंडळाचे विभाग प्रमुख बाळासाहेब देशमुख, गुलाब बधाले रोहिदास जगदाळे, अनिल घारे, संजय खिलारे, युवराज देवकर, शिवाजीराव बोडके, बाळासाहेब बेल्हेकर, शंकरराव खेंगले, सूर्यकांत दांगट, माधव वाटाणे, सोपान दाभणे, विजय गायखे, निवृत्ती नखाते, सोपान भसे, चिलाजी मराठे आदी उपस्थित होते.






