*प्रगतीच्या सामूहिक जबाबदारीचे भान पाल्यांना द्यावे – रामदास काकडे*
तळेगाव दाभाडे: आज भारताचे सकल राष्ट्रीय उत्पन्न मोठ्या प्रमाणावर वाढत असून भारत वेगाने प्रगती करीत आहे. आपल्याजवळ चांगले मनुष्यबळ असून नव्या पिढी मधील हे मनुष्यबळ अधिक प्रबळ आणि समृद्ध करण्यासाठी पालकांनी जाणीवपूर्वक आपल्या पाल्यांना घडवणे आवश्यक असल्याचे मत इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास आप्पा काकडे यांनी व्यक्त केले. इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या बीबीए व बीसीए विभागाच्या वतीने आयोजित पालक मेळाव्यात ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते. याप्रसंगी संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संभाजी मलघे, बीबीए व बीसीए विभाग प्रमुख प्रा. विद्या भेगडे, श्री गोरख काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना काकडे म्हणाले की, जग आज प्रचंड वेगाने बदलत आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाचा विस्तार मोठ्या प्रमाणावर होत आहे. हे बदल पालकांनी तसेच शिक्षकांनी आत्मसात करून आपला पाल्य व विद्यार्थी घडविणे आवश्यक आहे. पालक व पाल्य यांच्यामधील नाते हे मित्रत्वाचे बनले पाहिजे.आज मावळ व चाकण पंचक्रोशीत देशभरातीलच नव्हे तर जागतिक स्तरावरील अनेक नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांचे जाळे उभे रहात आहे. या कंपन्यांमध्ये कुशल मनुष्यबळ पोचवण्यासाठी इंद्रायणी विद्या मंदिर संस्था सर्वतोपरी प्रयत्न करीत असून या पालकांनीही ही सामूहिक जबाबदारी उचलावी असे आवाहन यावेळी रामदासजी काकडे यांनी केले.
याप्रसंगी संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे यांनी पालकांशी संवाद साधला. बीबीए व बीसीए विभागामध्ये संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या भौतिक व शैक्षणिक सुविधा पुरविल्या जात आहेत. आद्ययावत संगणक लॅब, स्वतंत्र इमारत, सुसज्ज ग्रंथालय, उच्चविद्याविभूषित शिक्षक वर्ग अशा अनेक सोयींनी विभाग परिपूर्ण आहे असे शेटे म्हणाले.
महाविद्यालयातील प्लेसमेंट सेंटर हे अत्यंत कार्यक्षमतेने काम करीत असून विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा घेत स्वतःचे करिअर घडवण्याचे आवाहन यावेळी चंद्रकांत शेटे यांनी केले.
याप्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा आढावा घेतला. आज व्यवसायिक अभ्यासक्रम शिकविणाऱ्या महाविद्यालयांमध्ये इंद्रायणी महाविद्यालयाचा बीबीए व बीसीए हा विभाग एक नामांकित विभाग म्हणून ओळखला जातो असे सांगत पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांनी सातत्याने महाविद्यालय व पर्यायाने शिक्षकांशी संवाद साधने गरजेचे असल्याचे मत डॉ. मलघे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विभागप्रमुख प्रा.विद्या भेगडे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी पालकसभेचा हेतू व उद्दिष्टे स्पष्ट करून. शैक्षणिक वर्षांमध्ये सुरू असलेले उपक्रमांचा आढावा घेतला. आज विभागाच्या प्रगतीत विद्यार्थी, पालक व संस्थेचे योगदान अनन्यसाधारण असल्याच्या कृतज्ञ भावना यावेळी प्रा. विद्या भेगडे यांनी व्यक्त केल्या. शिस्त आणि गुणवत्ता यांचा मेळ साधत आम्ही आमचे विद्यार्थी परिपूर्ण घडवू असे आश्वासन विभागप्रमुख म्हणून त्यांनी पालकांना यावेळी दिले. याप्रसंगी भालचंद्र बिराजदार, सुहास ताटे, धवल कासार, कृष्णा जाधव, रुबीना रेगो, ऋतिका मोरे व निलेश बालूटकर आदी पालकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. योगिता दहिभाते यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. श्वेता खांदवे यांनी केले. याप्रसंगी बीबीए बीसीए , द्वितीय व तृतीय वर्षात प्रवेश घेतल्या विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.