“विकासाशिवाय कर वसुली अन्यायकारक! — किवळे, रावेत, मामुर्डीतील नागरिकांचा धरणा”
पिंपरी चिंचवड:

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि फुले-शाहू-आंबेडकर विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने किवळे येथील कर संकलन कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व धर्मपाल तंतरपाळे यांनी केले.
प्रभाग क्रमांक १६ — विकासनगर, किवळे, रावेत, मामुर्डी ही गावे १९९७ साली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत समाविष्ट झाल्यानंतर तब्बल २७ वर्षांनंतरही या भागाचा विकास झाला नसल्याचा नागरिकांचा आक्रोश होता.
नागरिकांनी सांगितले की, “गार्डन नाही, खेळाचे मैदान नाही, महिला-पुरुष शौचालय नाही, रस्ते डांबरीकरण झालेले नाही — परंतु दरवर्षी घरगुती मिळकत कर मात्र नियमित वसूल केला जातो.”
महानगरपालिकेच्या २०२४-२५ आर्थिक वर्षात या प्रभागासाठी फक्त सुमारे ८ कोटी ५० लाख रुपये मंजूर करण्यात आले, जो निधी अत्यल्प असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. शास्तीकर माफीचा नागरिकांना नेमका किती लाभ मिळाला याचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
“जोपर्यंत प्रभाग क्रमांक १६ चा सर्वांगीण विकास होत नाही, तोपर्यंत कर वसुली थांबवावी,” अशी ठाम मागणी या आंदोलनातून करण्यात आली.
या आंदोलनात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे गौतम गायकवाड, श्रीमंत शिवशरण, दिलीप कडलक, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कदम, राजेंद्र महाले, बापूसाहेब गायकवाड, विशाल साळवी, पालाराम दुमडा, भास्कर म्हेत्रे, किरण कांबळे, प्रकाश गायकवाड, मेघराज तंतरपाळे, अजय बखारिया, उद्योजक दिलीप भाऊ दांगट, रोहित माळी, अशोक मुराई, रवी कडू, बाळासाहेब झंजाट, अमित कागडा तसेच जय हिंद बँकेचे संचालक धनाजी विनोदे, सामाजिक कार्यकर्ते शांताराम भोंडवे, बाळासाहेब मराठे, भाजपचे मोहन राऊत आणि गोरख (दादा) तरस आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कर संकलन कार्यालयाचे अधीक्षक राजेश बांदल आणि वरिष्ठ लिपिक कांचन भवारी यांनी आंदोलनकर्त्यांना लेखी उत्तर दिल्यानंतर आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले.






