*समृध्द महाराष्ट्राच्या उभारणीत सामूहिक प्रयत्नांची गरज*: श्री *रामदास काकडे*
तळेगाव दाभाडे: महाराष्ट्र आज प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे. सातवाहन काळात समृध्द महाराष्ट्राची पायाभरणी झाली आणि आज हा समृध्द वारसा पुढे नेण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची असल्याचे मत प्रसिद्ध उद्योजक व इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदासआप्पा काकडे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र दिनानिमित्त इंद्रायणी विद्या मंदिर संस्था आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे, सदस्य विलास काळोखे, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, बी फार्मसी महाविद्यालाचे प्राचार्य डॉ. संजय आरोटे, डी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य गुलाब शिंदे, इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. संदीप भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना रामदास काकडे म्हणाले की, महाराष्ट्राच्या बाबतीत काल, आज आणि उद्याचा विचार करताना मोठया राजकीय, संस्कृतिक आणि वैचारिक वारशाचे आपण पाईक आहोत ही अतिशय आनंदाची बाब मनाला समाधान देते. छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्यात प्रत्येक गोष्टींचा सूक्ष्म अभ्यास होता आणि स्त्रियांना सन्मान देत लोककल्याणकारी राज्याचा नवा आदर्श महाराजांनी निर्माण केला.हा विचारांचा समृध्द ठेवा आपला आहे. १०६ हुतात्म्यांनी बलिदान दिले आणि यशवंतराव चव्हाण यांनी स्वतंत्र महाराष्ट्राचा मंगल कलश आणला. हा महाराष्ट्र अजून समृध्द कसा होईल यासाठी सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे मत रामदास काकडे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी महाराष्ट्रच्या समृध्द जडणघडणीचा आढावा घेत उपस्थितांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमासाठी मोठया संख्येने प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आर.आर. डोके यांनी केले.