साते मोहितेवाडी फाट्याजवळ जुन्या मुंबई–पुणे महामार्गाच्या साईड पट्ट्या खचल्याने अपघाताचा धोका
वडगाव मावळ, :
जुन्या मुंबई–पुणे महामार्गावरील .साते मोहितेवाडी फाटा (ता. मावळ) येथे रस्त्याच्या साईड पट्ट्या गेल्या काही दिवसांपासून खचल्याने प्रवाशांना आणि वाहनचालकांना गंभीर धोका निर्माण झाला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना तयार झालेल्या खोल खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता वाढली असून, स्थानिक नागरिकांनी संबंधित विभागाचे लक्ष वेधले आहे.
दररोज या मार्गावरून हजारो वाहने मुंबई आणि पुण्याकडे ये–जा करतात. विशेषतः सकाळ–संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी मोठ्या वाहनांची वाहतूक सुरू असते. खचलेल्या पट्ट्यांमुळे वाहनांचे संतुलन बिघडून अपघात होण्याचा धोका संभवतो. काही दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाल्याच्या घटना येथे घडल्या आहेत.
महामार्ग विभागाकडे स्थानिक नागरिकांनी याबाबत वारंवार तक्रारी केल्या असल्या, तरी अद्याप दुरुस्तीचे कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही. पावसाळ्यानंतर रस्त्याची स्थिती अधिकच बिकट झाली असून, पट्ट्या खोलवर खचल्याने पाणी साचते आणि रस्ता ओला झाल्यावर वाहनांचे नियंत्रण सुटण्याची शक्यता वाढते.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, “दररोज वाहनचालकांनी जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. संबंधित विभागाने तातडीने दुरुस्ती करून सुरक्षित वाहतुकीची सोय करावी,” अशी मागणी होत आहे.
रस्त्याच्या या भागाची दुरुस्ती न झाल्यास मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित प्रशासनाने तातडीने तपासणी करून योग्य उपाययोजना करणे अत्यावश्यक ठरत आहे.






