बऊर खिंडींच्या पायथ्याशी अजगराचा हल्ला – शेळी ठार; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
कामशेत (मावळ):
बऊर खिंडींच्या पायथ्याशी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. नंदू दळवी यांच्या मालकीच्या शेळीवर सकाळी एका प्रचंड अजगराने हल्ला चढवून ती शेळी ठार केल्याची घटना समोर आली आहे.
स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नंदू दळवी यांची शेळी नेहमीप्रमाणे सकाळी चरण्यासाठी बाहेर गेली असता ही घटना घडली. शेळीचा आवाज ऐकून शेतकरी घटनास्थळी पोहोचले असता ग्रामस्थांनी पाहिले अजगर शेळीला गिळण्याचा प्रयत्न करत आहे. गावकऱ्यांनी तत्काळ सर्पमित्रांशी संपर्क करत अजगराला पकडून सुरक्षित स्थळी सोडून दिले. मात्र, तोपर्यंत शेळीचा मृत्यू झाला होता.
या घटनेमुळे बऊर खिंडी परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. “अजगर वारंवार दिसत आहेत, त्यामुळे जनावरांच्या सुरक्षिततेसाठी वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात,” अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.






