महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आई एकवीरा देवीच्या चरणी साडी चोळी समर्पित
कार्ला :
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आई एकवीरा देवीच्या चरणी साडीचोळी समर्पित करण्यात आली आहे. शिवसेना सचिव वैभव थोरात, व शिवसेना मावळ तालुकाप्रमुख राजेश खांडभोर हे सदरची देवीची ओटी घेऊन आज कार्ला गडावरील आई एकवीरा देवीच्या मंदिरात आले होते. आई एकवीरा देवीच्या चैत्रियात्रेला गुढीपाडव्यापासून सुरुवात झाली आहे. आज षष्ठी या दिवशी आई एकवीरा देवीचा भाऊ श्री काळभैरवनाथ यांच्या पालखी मिरवणुकीचा सोहळा देवीचे माहेरघर असलेल्या देवघरामध्ये होणार आहे. तर उद्या सप्तमीच्या दिवशी आई एकवीरा देवीच्या गडावर सायंकाळी पालखी मिरवणुकीचा भव्य सोहळा असणार आहे. यात्रेच्या निमित्त श्री एकनाथ शिंदे यांच्यावतीने देवीला साडी चोळीची ओटी समर्पित करण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्या पाठपुराव्यानंतर आई एकवीरा देवीच्या मंदिराचा व गड परिसराचा विकास करण्यासाठी चाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यांच्याच हस्ते या ठिकाणी विकास कामाचे देखील भूमिपूजन झाले असून काही कामांना सुरुवात झाली आहे. येत्या काळामध्ये आई एकवीरा देवीच्या गडावर मोठ्या प्रमाणात विकास कामे करत येथे येणाऱ्या भाविकांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस एकनाथ शिंदे यांचा असल्याचे राजेश खांडभोर यांनी सांगितले.