मावळात बसथांबे ‘लुप्तप्राय’; प्रशासनाचा निष्काळजीपणा उघड—प्रवाशांचा जीव मुठीत

SHARE NOW

मावळ :

तालुक्यातील बसथांबे अक्षरशः गायब होण्याच्या मार्गावर! जेथे-जेथे थांबे उरले आहेत, त्यांची अवस्था बघून असं वाटतं प्रशासनाने त्यांना ‘जागतिक वारसा’ दर्जा द्यावा, कारण ते लवकरच इतिहासात जमा होतील. लोकप्रतिनिधी आणि पीएमपीएमएल प्रशासनासाठी ही वस्तुस्थिती कितपत भूषणावह आहे, हा प्रश्न आता नागरिक विचारु लागले आहेत मावळाची ओळख ‘गैरसोयीची राजधानी’ म्हणून जगभर पोहोचत चालली आहे, हे नागरिकांच्या अभिमानाचं कारण ठरणार की लाजेचं?

 

ऊन, पाऊस, थंडी काहीही असो या अव्यवस्थेचा सर्वाधिक फटका बसतो तो विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनाच. बसथांबे नसल्यामुळे उघड्यावर उभं राहून प्रवास करणं, हे आज मावळवासीयांचं रोजचं दुःख बनलं आहे. आणि त्यामुळे एकच सवाल सतत ऐकू येतो

“निवडणुकीत दिलेली वचनं नेमकी गेली कुठे?

Advertisement

 

लोनावळा–निगडी मार्गावर आधुनिक पद्धतीचे बसथांबे उभारू, असे ठणकावून सांगणारे आमदार–खासदार आज मौनात. आधुनिकता तर सोडाच, साधा पक्का बसथांबा शोधायलाही दुर्बिण लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदही मागे नाही. नागरिकांना मोठमोठी स्वप्नं दाखवत त्यांनी दहा ठिकाणी “स्मार्ट बसथांबे” उभारण्याची घोषणा केली होती. पण प्रत्यक्षात—ना स्मार्ट बसथांबे, ना कामाचा मागमूस. निधी कुठे गेला? योजना कागदावरच का अडकली? राबवणार कोण?—यांची उत्तरं प्रशासनाकडेही नाहीत आणि नागरिकांकडे तक्रारींचा ढिग मात्र वाढतच आहे.

दरम्यान प्रवासी मात्र आजही त्याच ठिकाणी, त्याच त्रासात उभे.

त्यांची आर्त मागणी तशीच

“बसथांबे द्या… वचनपूर्ती करा.

मावळ तालुका खऱ्या अर्थाने आधुनिकतेकडे कधी जाणार? की लोकप्रतिनिधींच्या वचनांच्या विहिरीतच अडकून राहणार?

उत्तर मात्र सत्ताधाऱ्यांनाच द्यावं लागेल.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page