पवनानदीला पुर, कोथुरणे पूल पाण्याखाली
पवनानगर :
पवन मावळात सध्या अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे. गेल्या ४८ तासांपासून पवना धरण क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत असून यामुळे धरणाच्या पाणीपातळीत वेगाने वाढ होत आहे. यापार्श्वभूमीवर धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्याकरिता धरणातून मोठ्याप्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. शनिवारी (दि. २६ जुलै) रोजी सकाळी ११ वाजता घेतलेल्या माहितीनुसार धरणातून ७ हजार १४० क्युसेक विसर्ग सुरू असून यामुळे पवना नदीवरील कोथूर्णे जवळील पूल पाण्याखाली गेला आहे.तर काले येथील स्वयंभु मंदिर पाण्याखाली गेले आहे.
पवना धरणातून पवना नदीपात्रात ७ हजार ४१० विसर्ग सुरू असून पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन संनियंत्रण अधिकारी, मध्यवर्ती पुरनियंत्रण कक्ष, पुणे यांनी दिला आहे. जोरदार पावसाचा ग्रामीण भागाला मोठा तडाखा बसला असून अनेक ठिकाणी नागरिकांना मुसळधार पाण्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पवना धरणातून ७,४१० क्युसेक्स ने सुरू केलेल्या विसर्गामुळे कोथुर्णे जवळील पूल पाण्याखाली गेला आहे. पवना धरण प्रशासनाने सकाळी ९ वाजता हा उच्च विसर्ग सुरू केला आहे. यामुळे कोथुर्णे, वारू आणि मळवंडी या गावांचा पवनानगर बाजारपेठेशी संपर्क तुटला आहे. परिणामी या भागातील दुग्धव्यवसायिक, शेतकरी आणि शाळकरी विद्यार्थी यांना आता शिवली व ब्राम्हणोली मार्गे किंवा कडधे मार्गाने पवनानगर आणि कामशेतकडे प्रवास करावा लागत आहे.
नागरिकांचे दैनंदिन व्यवहार अडचणीत आले आहेत. धरण प्रशासनाने सांगितले की, पाणलोट क्षेत्रात अजूनही पाऊस सुरू असल्याने विसर्ग कमी-जास्त केला जाऊ शकतो. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.






