मावळ परिसरात शोककळा : जाधववाडी धरण व पवना नदीत बुडून ४ तरुणांचा मृत्यू
तळेगाव दाभाडे/मावळ, दि. १ मे :
मावळ तालुक्यात कामगार दिनाच्या सुट्टीत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणांवर दुर्दैवी संकट कोसळले असून, जाधववाडी धरण (नवलाख उंबरे) आणि साळुंब्रे येथील पवना नदीत बुडून चार तरुणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
नवलाख उंबरे येथील जाधववाडी धरण परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या तरुणांपैकी अजय गारुडे, संतोष एडके आणि अनिकेत पवार हे पाण्यात पोहण्यासाठी उतरले होते. मात्र पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अचूक अंदाज न आल्याने एकूण पाच जण बुडाले. स्थानिकांच्या तत्परतेमुळे दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले, तर तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक रेस्क्यू पथकाने घटनास्थळी धाव घेतली. बुडालेल्या तरुणांना बाहेर काढून सीपीआर देण्यात आला, मात्र उशीर झाल्याने त्यांना वाचवणे शक्य झाले नाही.
दरम्यान, साळुंब्रे येथील जुन्या दगडी पुलाजवळही अशीच एक दुर्घटना घडली. मनोज भारत गौतम (वय २५, मूळ उत्तर प्रदेश) हा तरुण सकाळी सुमारे ८ वाजता पवना नदीत पोहण्यासाठी उतरला होता. पाण्याची खोली न समजल्याने तो बुडाला. मनोज हा स्थानिक काळोखे पाईप लाईन कंपनीत कार्यरत होता.
घटनेनंतर वन्यजीव रक्षक मावळ संस्था, शिवदुर्ग मित्र लोणावळा तसेच NDRF च्या पथकांनी तातडीने बचावकार्य हाती घेतले. अथक प्रयत्नांनंतर सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले. जाधववाडी येथील मृतांना ‘विरा ॲम्बुलन्स’च्या मदतीने जनरल हॉस्पिटल, तळेगाव दाभाडे येथे नेण्यात आले, तर साळुंब्रे येथील तरुणाला पुढील तपासणीसाठी पवना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
या बचावकार्यात निलेश गराडे, अनिल आंद्रे, भास्कर माळी, विनय सावंत, कमल परदेशी, शुभम काकडे, विकास दोड्डी, भारत मेहेंदळे, कमलेश राक्षे, सर्जेस पाटील, विकी दौंडकर, अविनाश कार्ले, रवी कोळी, कुंदन भोसले, हर्षद काळोखे, राजू सय्यद, करण भांगरे तसेच विरा ॲम्बुलन्स टीमने मोलाचे योगदान दिले.
दरम्यान, प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये धरण व नदी परिसरात फिरताना पाण्याची खोली, प्रवाह आणि सुरक्षिततेची साधने यांची खात्री करूनच पाण्यात उतरावे






