तळेगावची अनघा बडगुजर चमकली! राष्ट्रीय कुंग फू स्पर्धेत सुवर्ण व कांस्य पदक
तळेगाव दाभाडे :
मेघालय युनिव्हर्सिटी येथे २४, २५ व २६ एप्रिल रोजी पार पडलेल्या दहाव्या राष्ट्रीय कुंग फू चॅम्पियनशिपमध्ये तळेगाव दाभाडे येथील कुमारी अनघा (नगर) अनंत बडगुजर हिने उल्लेखनीय यश संपादन करत सुवर्ण व कांस्य पदक पटकावले.
१४ वर्षांखालील गटात तिने तावलू बेअरहॅन्ड प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक मिळवले, तर सांडा किक बॉक्सिंग प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली. तिच्या या यशामुळे तळेगाव परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या स्पर्धेत ओरिसा, मणिपूर, सिलवासा, महाराष्ट्र, आसाम आदी राज्यांसह देशभरातील हजारो स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे आयोजन कुंग फू असोसिएशन मेघालय यांनी केले होते.
अनघाला प्रशिक्षक सी. एल. लामा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सातत्याने कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर हे यश मिळवल्याचे अनघाने सांगितले. भविष्यात एशियन गेम्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा तिने व्यक्त केली.
तिच्या यशामागे आई अर्चना बडगुजर आणि वडील अनंत बडगुजर यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. अनघा ही तळेगाव दाभाडे येथील लीलावती सोसायटीची रहिवासी असून तिच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.






