माळवाडी ते बेगडेवाडी रस्त्याची प्रचंड दुरवस्था
माळवाडी:
मावळ तालुक्यातील माळवाडी ते बेगडेवाडी रेल्वे स्टेशन दरम्यानचा रस्ता पावसामुळे अक्षरशः खड्ड्यात गेला आहे. या रस्त्याची चाळण झाली असून ठीक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहे त्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. तळेगाव चाकण महामार्गाला जुना पुणे मुंबई महामार्गाशी जोडणारा हा रस्ता असून या रस्त्यावरून दररोज शेकडो वाहने ये जा करत असतात. तळेगाव स्टेशन. माळवाडी. इंदोरी. शेलारवाडी या गावांसह अन्य नागरिक या रस्त्याने ये जा करत असतात. या रस्त्याची प्रचंड प्रमाणात दुरावस्था झाल्याने वाहन चालक व पादचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या रस्त्यालगतच घोरावाडी रेल्वे स्टेशन तसेच बेगडेवाडी रेल्वे स्टेशन आहे. स्थानिक लष्कराच्या मालकीच्या जागेत हा रस्ता असून लष्कराच्या विरोधामुळे या रस्त्याची कामे स्थानिकांना करता येत नाही. विशेष म्हणजे या मार्गालगतच लष्कराचा ऑर्डनन्स डेपो देखील आहे, याच रस्त्याने डेपो मधील सर्व कामगार ये जा करत असतात. या रस्त्याच्या संदर्भात अनेक वेळा आमदार खासदार यांच्याबरोबर स्थानिक नागरिकांनी संपर्क साधून या रस्त्याचे काम करावे अशी मागणी देखील केली आहे. मागील वर्षी आमदार सुनील शेळके यांनी स्वखर्चातून या मार्गावरील अनेक खड्डे मुरुमाने भरून देखील दिले होते. मात्र या भागातून जाणाऱ्या वाहनांची संख्या जास्त असल्याने तसेच जोरदार पावसाने हा रस्ता पुन्हा जैसे थे झाला आहे. तरी स्थानिक प्रशासनाने वेळेत दखल घेऊन तातडीने या रस्त्याची डागडुजी करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांसह शेतकरी व कामगार वर्ग तसेच या मार्गावरून ये जा करणाऱ्या नागरिकांनी केली आहे.