मध्ययुगातील मावळी शिलालेख बोलू लागले… संशोधक :- डॉ. प्रमोद बोराडे, श्री.दिपक पटेकर
मावळ :
शिलालेख हा इतिहासाचा प्राथमिक संदर्भ असल्याने प्रत्यक्षदर्शी म्हणून तो अव्वल पुरावा मानला जातो. “मराठी मुलखात पराक्रम मोठा मात्र इतिहास लिहून ठेवला नाही…” ही ओरड कायम ऐकू येते मात्र बखरी, शिलालेख, ताम्रपट, पत्रव्यवहार, तत्कालीन चरित्रग्रंथ यातून जी अस्सल माहिती प्राप्त होते त्यावरून वरील विधानास छेद देता येतो तसेंच यातून उपलब्ध होणारा इतिहास महत्वपूर्ण आहे.
मराठा कालीन शिलालेख मावळात प्रकाशीत – अप्रकाशीत असे बहुतांश उपलब्ध आहेत. करंजगाव, वडेश्वर, नायगाव अशा तिन्ही ठिकाणी चौरसाकृती बारव असून त्यांवर एकूण पाच शिलालेख देवनागरी लिपी व मराठी तसेंच संस्कृत भाषेत उपलब्ध आहेत. कर्वे घराणे हे मूळ कोकणचे हरिहरेश्वर येथील भट घराण्याचे कुलाचार्य म्हणजे कुलोपाध्ये होते. पेशवेंच्या महत्वपूर्ण समारंभाना तसेंच बारसे, मुंज, लग्न, पूजा धार्मिक विधी कर्वे – उपाध्ये करीत असत. पहिल्या बाजीरावाच्या कारकिर्दीत कर्वे यांना नाणे मावळ येथील करमुक्त जमीन वंश परंपरेने इनाम देण्यात आली.
🌸 करंजगाव-ब्राम्हणवाडी शिलालेख :
येथे निर्मिलेल्या बारवेच्या उतरणाऱ्या पायऱ्यांच्या भिंतीवर तीन ओळींचा शिलालेख आहे.
1) शके 1682 विक्रम संवत्सरे श्रीकाळभैरव
2) हरिहरेश्वर चरणी तत्पर समस्त कर्वे
3) निरंतर सेवेस माणकोजी पापळ
सदर बारव 1760-61 मध्ये अर्थात पानिपत तृतीय युद्धाच्या धामधुमीच्या काळातील असून बांधकाम – देखरेख करणारे पापळ हे आडनाव असणारे घराणे मावळातील नवलाख उंब्रे गावातील आहे.
🌸 वडेश्वर शिलालेख : वडेश्वर
येथील बारवेत उतरतांना पायऱ्यांच्या दोन्ही बाजूस कोरीव शिलालेख आहेत.
1) श्री
2) // शोभ — संवटेश्व क्षेत्रगदितावापी–//
3) //– पती:परिमिता संव विरोधी तदा //
4) // — पाक्षिमितेति// हरिहरे क्षेत्रस्थ ममोविज://
5) // पश्चा — सग: (कृत:)//
सदर शिलालेखात कर्वेंच्या मूळगावाचा उल्लेख हरिहरे क्षेत्र म्हणून आलेला आहे.
येथील दुसऱ्या शिलालेखात पाच ओळी आहेत.
1) श्री
2) // स्वस्ती श्री मन्नृप शालिवाहन शके 1691 विरोधी सं //
3) // वत्सरे माघ शुक्ल पंचमी बुधवासरे तद्दीने श्रीहरी//
4) // हर क्षेत्रस्थ करवे इत्यापाभिध श्रीधर भद्रेन इय वापिका बंधनोत्सर्ग: //
5) // कृत://
इसविसन 1670 मध्ये हरिहर क्षेत्राच्या कर्वे उपनाम धारण केलेल्या श्रीधर भट यांनी या वापी अर्थात टाकं याची निर्मिती केली. असा या शिलालेखाचा आशय आहे.
🌸 नायगाव शिलालेख :
येथील शिलालेखात वरील शिलालेखांच्या प्रमाणेच संस्कृत भाषा तसेंच देवनागरी लिपी आहे.
1) श्रीगजानन // शार्केगग्रहशास्रभूपरिमितेसंवत्सरेमन्माधवराय
2) भूपति वराण सेकुल चार्यक: // कर्वोपाभिधदिव्यभट्टतनुजोधर्मार्थबुध्या
3)खनीमार्गेपीधतनतूबोधरामनीनाद्यतनावापिकी // प्रारंभ://
सदर शिलालेखात कालोल्लेख शब्धमूल्य स्वरूपातील असून अग – 7, ग्रह – 9, शास्र – 6, भू – 1 याचे उलट वाचन केल्यास 1697 शक वर्षांक कळतो यात 78 मिळविले की 1775 इसविसन मध्ये ही बारव निर्मिलेली दिसते. या शिलालेखातील माधवराय म्हणजे सवाई माधवराव पेशवे होय.
येथील दुसऱ्या शिलालेखात 1) श्रीगजानन // स्वस्तिश्रीखखसप्तभूमितशकेराधे
2)कतिथ्यासीतेपक्षेभानुदिनेविलंबिनिशुभेसंवत्सरेजीवथ//
3)कर्वेइत्युपनामकोहरिहरक्षेत्रस्थसदुत्धीमांश्चक्रेवापिममुंज
4) नार्दनातिख्यात: शिवप्रीतये // श्रीकाशीविश्वेश्वरार्पण
5) मस्तु//
शिवाला प्रिय असणाऱ्या हरिहर क्षेत्राचे विद्वान, कर्वे उपनाम असलेल्या विख्यात जनार्धन भट यांनी ही वापी निर्मिली. यात ख – 0, ख – 0, सप्त – 7, भू – 1 असे उलट वाचन केले तर 1700 असा शालिवाहन शक मिळतो. इसविसन 1778 मध्ये याची निर्मिती झालेली निदर्शनास येते.
सारांश उपरोक्त पाचही शिलालेख मावळ तालुक्यामधील असून मध्ययुगातील इतिहास कथन करणारे इतिहासाचे बोलके साक्षीदार आहेत. या बारवांचा उपयोग पिण्याच्या पाण्यासाठी तसेंच शेती वगैरे अन्य वापरासाठी होत होता. या जलसाठ्यांना आजही जिवंत झरे असून ते लोकोपयोगी आहेत. मावळ तालुक्याचा इतिहास प्राचीन काळापासून स्वतंत्र्यापर्यंत अनेकविध नाट्यमय घटना, राजकीय डावपेच तथा लढाया यांनी भारलेला आहे. इतिहासाचे स्मरण या शिलालेखांच्या माध्यमातून पुनःश्च होत आहे…
डॉ.प्रमोद बोराडे,श्री.दीपक पटेकर