कल्याणी देशपांडेच्या गांजाविक्री रॅकेटचा भांडाफोड – पती, जावई, पुतणी अटकेत ; २१ किलो गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त
पिंपरी चिंचवड:
पिटा, मोका आणि खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांतून शिक्षा भोगून बाहेर आलेली कल्याणी उर्फ जयश्री उमेश देशपांडे हिने गांजा विक्रीचा काळा धंदा सुरू केल्याचे उघडकीस आले आहे. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत तिच्या साथीदारांच्या ताब्यातून तब्बल २१ किलो गांजा आणि मोबाईलसह ११ लाख २७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कल्याणी सध्या फरार असून तिचा शोध सुरू आहे. ही कारवाई पाषाण सुस रोडवरील ‘कल्याणी कलेक्शन’ नावाचे दुकान आणि तिच्या घरात करण्यात आली.
या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. त्यामध्ये कल्याणीचा पती उमेश सुर्यकांत देशपांडे (५६, रा. शिवालय सोसायटी, पल्लवी अपार्टमेंट, पाषाण), चुलत जावई अभिषेक विकास रानवडे (३२, सध्या रा. बालाजी निवास, पाषाण, मूळ रा. दुधाळवाडा, शनिवार पेठ) आणि पुतणी ऐश्वर्या अभिषेक रानवडे उर्फ ऐश्वर्या निलेश देशपांडे (२२, रा. शनिवार पेठ, पुणे) यांचा समावेश आहे.
उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणी देशपांडे हीने गांजा विक्री सुरू केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी छापा मारून तिघांना अटक केली. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून २० किलो ७३६ ग्रॅम गांजा, तीन मोबाईल आणि रोख ७०० रुपये असा एकूण ११ लाख २७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८(क), २०(ब)(ii)(क), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोण आहे कल्याणी देशपांडे ?
कल्याणी देशपांडे ही सराईत गुन्हेगार आहे. यापूर्वी ती वेश्याव्यवसाय चालवण्यात सक्रीय होती. अनेक पोलिस आधिकाऱ्यांना न जुमानता तिने वेश्याव्यवसाय चालवला होता. तिच्यावर डेक्कन, कोथरूड, चतुःश्रृंगी, हवेली आदी पोलीस ठाण्यांमध्ये खून, पिटा अॅक्ट, मोका आणि फसवणूक आदी गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. तर, अटकेत असलेल्या अभिषेक रानवडे याच्यावरही फरासखाना, विश्रामबाग व मार्केटयार्ड पोलीस ठाण्यांत खुनाचा प्रयत्न, अपहरण, बलात्कार व अंमली पदार्थ विक्रीसारखे गुन्हे दाखल आहेत.
यांनी केली कारवाई :
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या आदेशावरून, सह-आयुक्त शशिकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त संदिप डोईफोडे, स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहायक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, पोलीस अंमलदार जावेद बागसिराज, गणेश कर्पे, किशोर परदेशी, मयुर वाडकर, शिल्पा कांबळे, कपिलेश इगवे, चंद्रकांत जाधव यांनी ही कारवाई केली.