पवना हॉस्पिटल आणि मावळ तालुका मराठी पत्रकार संघ आयोजित आरोग्य तपासणी शिबिरास पत्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

SHARE NOW

सोमाटणे :मावळ तालुक्यातील पत्रकारांचे आरोग्याचे हित लक्षात घेत, मावळ तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू – भगिनींसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर मंगळवारी दिनांक २९ जुलै २०२५रोजी पवना हॉस्पिटल, सोमाटणे फाटा येथे आयोजित करण्यात आले होते. पवना हॉस्पिटलचे पवना मेडिकल फाउंडेशन आणि मावळ तालुका मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ह्या शिबिरास तालुक्यातील सर्वच विभागातील पत्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.

पवना हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. सत्यजित वाढोकर यांच्या मार्गदर्शनाखाली, डॉ. वर्षाताई वाढोकर, डॉ. प्रतिक वाढोकर यांच्या सहकार्याने आणि मावळ तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुदेश गिरमे, सल्लागार तथा ज्येष्ठ पत्रकार सोनबा गोपाळे, बबनराव भसे, प्रकल्प प्रमुख गणेश विनोदे, सचिव रामदास वाडेकर यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.

मावळ तालुका मराठी पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच तालुका पत्रकार संघाचे संलग्न पत्रकार संघ यात वडगाव शहर मराठी पत्रकार संघ, तळेगाव दाभाडे पत्रकार संघ, तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशन, देहूरोड-देहूगाव शहर मराठी पत्रकार संघ, लोणावळा शहर पत्रकार संघ, कामशेत शहर पत्रकार संघ आणि पवन मावळ मराठी पत्रकार संघ या संघांचे पदाधिकारी, सदस्य यांनी या शिबिरात सहभागी होत आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली.

पवना हॉस्पिटलच्या पवना मेडिकल फाउंडेशनचे सर्व डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी यांनी आरोग्य तपासणी शिबिरात योग्य प्रकारे प्रक्रिया पार पाडत पत्रकारांच्या आरोग्याच्या विविध तपासण्या पूर्ण केल्या. अत्याधुनिक मशीनच्या सहाय्याने काही तपासण्यांचे रिपोर्ट जागेवरच उपलब्ध झाले, त्यांच्या आधारे तज्ज्ञ डॉक्टरांनी आरोग्यविषयक सल्ले पत्रकारांना दिले. तसेच अन्य तपासणीचे रिपोर्ट आल्यानंतर पुढील प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले.

Advertisement

नियोजनबद्ध पद्धतीने अतिशय उत्तमरित्या आरोग्य शिबिर पार पडल्याबद्दल मावळ तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पवना हॉस्पिटल व पवना मेडिकल फाउंडेशनचे डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी यांचा सन्मान करीत कृतज्ञता व्यक्त केली. याकरिता शिबिरस्थळी छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रसंगी व्यासपीठावर पवना हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. सत्यजित वाढोवकर, डॉ. वर्षाताई वाढोवकर, डॉ. प्रतिक वाढोवकर आणि मावळ तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुदेश गिरमे, सल्लागार तथा ज्येष्ठ पत्रकार सोनबा गोपाळे, बबनराव भसे, ज्येष्ठ पत्रकार रमेश जाधव, ज्ञानेश्वर वाघमारे, अमिन खान उपस्थित होते.

संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शिबिरास विशेष सहकार्य केल्याबद्दल डॉ. सत्यजित वाढोवकर, डॉ. वर्षाताई वाढोवकर, डॉ. प्रतिक वाढोवकर आणि आयोजनाबद्दल डॉ. फरीदा बेग, डॉ. मंधुली बागवे, डॉ. स्नेहा उमाडे, सुनिल निकम, शितल पवार यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना डॉ. वर्षाताई वाढोवकर यांनी, पवना हॉस्पिटल हे नेहमीच रुग्नसेवेला प्राधान्य देत कार्यरत असलेले रुग्णालय असल्याचे सांगून रुग्णालयाचा २७ वर्षांचा प्रवास पत्रकारांसमोर उलगडला. तसेच यापुढेही पवना हॉस्पिटलच्या माध्यमातून असे अनेक समाजपयोगी उपक्रम राबविण्याचा मनोदय व्यक्त केला. डॉ. प्रतिक वाढोवकर यांनी आपले मनोगत व्यक्त करीत, पत्रकार बांधवांसोबत नेहमीच राहण्याचा, त्यांच्या आरोग्याच्या हिताचे उपक्रम राबविण्यास सहकार्य करण्याचा मनोदय बोलून दाखविला.

मावळ तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुदेश गिरमे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सल्लागार सोनबा गोपाळे यांनी पत्रकारांचे आरोग्य व आरोग्य शिबिराची गरज याबद्दल मत मांडून पवना हॉस्पिटलच्या सहकार्याबद्दल सर्वांचे धन्यवाद मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकल्प प्रमुख गणेश विनोदे यांनी केले, तर आभार उपाध्यक्ष अमिन खान यांनी मानले. आरोग्य तपासणी झालेल्या सर्व पत्रकार बांधवांसाठी पवना हॉस्पिटलकडूनच अल्पोपहाराची छान सोय देखील करण्यात आली होती.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page