पीडीईएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, आकुर्डी येथे ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत रॉकेट प्रक्षेपण संपन्न
आकुर्डी, पुणे:

पीडीईएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, आकुर्डी, पुणे येथे ‘आनंददायी शनिवार’ या उपक्रमांतर्गत इग्नाइटिंग ड्रीम्स ऑफ यंग माईंड फाउंडेशन, ‘अंतरिक्ष ज्ञान अभियान’ चे युवा रॉकेट वैज्ञानिक पूजा वायाल यांनी एस.एल.व्ही, पीएसएलव्ही, जीएसएलव्ही इत्यादी रॉकेट प्रक्षेपणांशी संबंधित संकल्पना स्पष्ट केल्या. तसेच, अंतराळ संशोधनाशी संबंधित अनेक रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होऊ शकतात आणि घरगुती वस्तूंचा वापर करून रॉकेट कसे बनवता येते, याची मौल्यवान माहिती विद्यार्थ्यांना दिली.
प्रक्षेपणाच्या वेळी सर्व विद्यार्थी इतके उत्साहित होते की, त्यांनी प्रक्षेपणाच्या अंतिम टप्प्यापूर्वी ‘भारत माता की जय’ चा नारा देत, दहा ते एकपर्यंतची अंक उच्चारत आपला सहभाग दर्शवला. मुख्याध्यापिका प्रिती दबडे यांच्या हस्ते या शाळेतील पहिल्या रॉकेट प्रक्षेपणाचे अभूतपूर्व प्रदर्शन पार पडले. दुसऱ्या आणि तिसऱ्या रॉकेटचे प्रक्षेपण विद्यार्थ्यांच्या हस्ते करवून घेतल्याने त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही.
हा कार्यक्रम पाहताना सर्व विद्यार्थ्यांनी जोश, उत्साह आणि आनंदाचा अनुभव घेतला. असे अद्भुत प्रक्षेपण पाहताना शाळेतील सर्व कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे डोळे विस्फारले गेले.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्रिती दबडे यांच्या मार्गदर्शनामुळे हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. त्या म्हणाल्या की, “अशा प्रकारच्या ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमांच्या आयोजनामुळे नवीन पिढीमध्ये जिज्ञासा, नवोपक्रम तसेच विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित यांसारख्या क्षेत्रांमध्ये रुची निर्माण होऊ शकते.”






