बडे अनमोल हे गीतों के बोल- डॉ. सुनील देवधर
तळेगाव दाभाडे :

हिंदी चित्रपट दिग्दर्शकांनी एक पिढी समृद्ध करत सामाजिक सांस्कृतिक कार्यात दिलेले योगदान अतिशय उल्लेखनीय आहे. गुलजार यांनी
दिल की उम्मीदों का हौसला तो देखो
इंतजार उसका है
जिसको अहसास तक नहीं…
अशी शेरो शायरी करत, हिंदी चित्रपट गीते ही अशी समृद्ध झाली आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील गीतांमधील भावनात्मक गूढता, साहित्यिकता आणि सांस्कृतिक संदर्भ तसेच शब्दांबरोबर केलेली तडजोड वाखाणण्यासारखी आहे.
असे उद्गार आकाशवाणी पुणे केंद्राचे निवृत्त सहाय्यक संचालक डॉ. सुनील केशव देवधर यांनी काढले. ते काल हिंदी विभाग आयोजित ‘हिंदी फ़िल्मी गीत : साहित्य और संस्कृति की कसौटी पर’ ह्या विषयाच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या विशेष व्याख्यानात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, हिंदी विभाग प्रमुख डॉ. मधुकर देशमुख, प्रा. राजेंद्र आठवले आधी उपस्थित होते.
हिंदी चित्रपट गीते आणि त्यातील गमती जमती आणि शब्दांशी लेखक, कवी, दिग्दर्शकांनी साधलेला हृदयी संवाद त्यातून ध्वनीत झालेले अर्थ, संस्कृती आणि सामाजिक संदर्भ यांचे दाखले देत ‘बडे अनमोल हे गीतों के बोल’ या डॉ. देवधर लिखित पुस्तकात आलेल्या अनेक संदर्भ आणि उदाहरणे देत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. राष्ट्रगीत, गझल, प्रेमगीत या गीतप्रकारांचे त्यांनी आपल्या लालित्यपूर्ण भाषेत विश्लेषण करत गीतांचे भावविश्व उलगडून दाखवले. चित्रपट गीतं म्हणजे भावनांचा सर्जनशील आविष्कार आहे. त्यामधील काव्यगुण, भाषिक सौंदर्य आणि संस्कृतीचे प्रतिबिंब विद्यार्थ्यांनी जाणून घेणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
उपस्थित विद्यार्थी प्राध्यापकांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तर देत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. मलघे म्हणाले की, “पूर्वीची हिंदी फ़िल्मी गीतं ही केवळ मनोरंजन नव्हे, तर त्या आपल्या समाजाच्या भावना, संस्कृती आणि मूल्यांचं प्रतिबिंब अधोरेखित करत होती. आताच्या उडत्या चालीच्या गाण्यांनी सामाजिक भान जपायला पाहिजे अशीही खंत त्यांनी व्यक्त केली. अनेक मराठी हिंदी चित्रपट गीतांवर संशोधक विद्यार्थी संशोधन करताना दिसून येत आहे. अशा गीतांचा अभ्यास विद्यार्थ्यांच्या साहित्यिक दृष्टीकोनाला समृद्ध करत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभागप्रमुख डॉ. मधुकर देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. राजेंद्र आठवले यांनी मानले. यावेळी कला व विज्ञान शाखेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. विजयकुमार खंदारे, प्रा. डॉ. संदीप कांबळे, प्रा. मिलींद खांदवे, प्रा. दीपक मोरे यांनी विशेष सहकार्य केले.






