मावळ तालुक्यातील पहिल्या एसटीइएम लॅबचे उद्घाटन: ओवळे शाळा, पुणे
ओवळे :

मावळ तालुक्यातील एक शैक्षणिक टप्पा पार करत, ओवळे गावातील जिल्हा परिषद शाळेत महाराष्ट्रातील पहिल्या हॅन्ड इन हॅन्ड इंडिया संस्था समर्थित एस टी इ एम लॅबचे उद्घाटन करण्यात आले. ही लॅब अँटॉलीन या कंपनीच्या सी एस आर सहकार्यामुळे शक्य झाली आहे.
या कार्यक्रमात अँटॉलीन चे श्री. जोईस सॅम्युअल (वरिष्ठ संचालक) आणि श्री. दत्तात्रय बहिरट (प्लांट मॅनेजर) यांनी सहभाग घेतला. त्यांच्यासोबत श्री. संदीप मुखर्जी, श्री. लोकेश गणपती आणि हॅन्ड इन हॅन्ड इंडिया संस्था महाराष्ट्र टीम उपस्थित होती. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि सदस्य, गावकरी आणि विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे उत्तम आयोजन केले.

कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक लाजिम सादरीकरण आणि स्वागतगीताने झाली. त्यानंतर सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले.
ही एसटीइएम लॅब इयत्ता १ली ते ७वीच्या १११ विद्यार्थ्यांना लाभदायक ठरणार असून विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या विषयांची प्रात्यक्षिक आणि सर्जनशील शिकवणी यातून होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य आणि विचारशक्ती विकसित होईल.मुख्याध्यापक कुलकर्णी यांनी सांगितले की, गेल्या ८ वर्षांपासून HiHI आणि Antolin या संस्थांचा ओवळे गावाला मोठा पाठिंबा आहे. या भागातील पहिली ई-लर्निंग शाळा ओवळे गावात सुरू झाली होती, आणि आता पहिली STEM लॅब देखील येथेच सुरु झाली आहे. जोईस सॅम्युअल यांनी सांगितले की, स्पेनमधील जागतिक कंपनी असलेल्या Antolin चा विश्वास आहे की ग्रामीण भागातील मुलांनाही आधुनिक शिक्षणाची संधी मिळायला हवी. श्री. दत्तात्रय बहिरट यांनी सांगितले की STEM शिक्षण आज 112 देशांमध्ये दिले जाते आणि ते शिक्षण आकर्षक आणि कौशल्याधारित बनवण्यासाठी उपयुक्त आहे.
संदीप मुखर्जी यांनी विद्यार्थ्यांना मन लावून अभ्यास करणे, आरोग्याची काळजी घेणे आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा सल्ला दिला.
कार्यक्रमात 3D पेन आणि 3D प्रिंटर यांचे प्रात्यक्षिकही दाखवले गेले. गावकऱ्यांनी या उपक्रमाचे कौतुक करून त्याच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
हा उपक्रम ग्रामीण विद्यार्थ्यांना STEM च्या जगाशी लवकर संपर्क साधण्याची संधी देतो.






