बेकायदेशीर पिस्तूल जवळ बाळगल्याप्रकरणी २३ वर्षीय तरुणाला अटक. शिरगाव पोलिसांची सोमाटणे फाट्याजवळ धडक कारवाई
सोमाटणे (ता. मावळ) :परंदवडी रोड, सोमाटणे फाटा परिसरात पोलिसांनी एका २३ वर्षीय तरुणाला बेकायदेशीर पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जवळ बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (१४ ऑक्टोबर) रात्री श्री चौराई सिटी समोर करण्यात आली.
या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल गणेश सावंत यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव अजय गुलाब साळुंके (वय २३, रा. नेरे दत्तवाडी, ता. मुळशी) असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अजय साळुंके याच्याकडे सुमारे ५२ हजार रुपये किमतीचे लोखंडी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. तपासादरम्यान त्याच्याकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही वैध परवाना नसल्याचे उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी त्याला त्वरित ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला.
शिरगाव पोलिसांनी आरोपीकडून पिस्तूल आणि काडतुसे जप्त केली असून, या शस्त्रांची खरेदी कोठून आणि कोणत्या उद्देशाने करण्यात आली याचा तपास सुरू आहे. पुढील चौकशी शिरगाव पोलीस ठाण्याचे पथक करत आहे.






