नाटेक’ एकांकिकेला वगसम्राट दादू इंदुरीकर करंडक राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम पारितोषिक. मॉडर्न महाविद्यालयाची ‘वामन आख्यान’ द्वितीय, राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाची ‘उमज’ तृतीय
तळेगाव दाभाडे:
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, तळेगाव दाभाडे शाखेतर्फे आणि कलापिनी संस्थेच्या सहकार्याने, वगसम्राट दादू इंदुरीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत पुण्यातील कलाकार मंडळी संघाच्या ‘नाटेक’ या एकांकिकेने प्रथम क्रमांक मिळवित वगसम्राट दादू इंदुरीकर करंडक पटकावला.
मॉडर्न महाविद्यालयाच्या ‘वामन आख्यान’ या एकांकिकेला द्वितीय, तर ताथवडे येथील राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘उमज’ या एकांकिकेला तृतीय क्रमांक प्राप्त झाला.
या विजेत्या संघांना अनुक्रमे ₹५१,०००, ₹३५,००० आणि ₹२५,००० इतके रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
उत्तेजनार्थ एकांकिकेसाठी अहिल्यानगरच्या न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या ‘पिसाळा’ या एकांकिकेला विशेष पुरस्कार मिळाला.
तर सर्वोत्कृष्ट विनोदी एकांकिकेचा पुरस्कार महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी सिनिअर कॉलेज, पुणे यांच्या ‘यथा प्रजा तसे राजा’ या एकांकिकेला मिळाला. या संघाला ₹११,००० चे रोख पारितोषिक देण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती आणि गौरवोद्गार
या पारितोषिक वितरण सोहळ्यास अ. भा. म. नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष (प्रशासन) भाऊसाहेब भोईर, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, अभिनेत्री सविता मालपेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे सांस्कृतिक सेल अध्यक्ष बाबासाहेब पाटील, सत्यशीलराजे दाभाडे, कलापिनीचे विश्वस्त डॉ. अनंत परांजपे, अध्यक्ष विनायक अभ्यंकर, नाट्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश धोत्रे, नृत्य अभ्यासिका डॉ. मीनल कुलकर्णी, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचे परीक्षण नरेंद्र आमले, मोहन खांबेटे आणि अंजली धारू यांनी केले. आपल्या मनोगतात नरेंद्र आमले म्हणाले, “कलाकारांनी अभिनयाबरोबरच आवाजाच्या प्रोजेक्शनकडे आणि स्पर्धेचे नियम पाळण्याकडे विशेष लक्ष द्यावे.”
भाऊसाहेब भोईर म्हणाले, “नाट्य परिषदेच्या शाखा वाढणे गरजेचे आहे. आजच्या काळात कलाकारांना व्यासपीठ मिळवणे अवघड झाले आहे, पण तळेगावमध्ये कलापिनी संस्था कलाकारांसाठी मोठा आधार आहे.”
मेघराजराजे भोसले यांनीही तळेगावातील सांस्कृतिक परंपरा टिकवून ठेवण्यात कलापिनी आणि नाट्य परिषदेच्या भूमिकेचे कौतुक केले.
अभिनेत्री सविता मालपेकर म्हणाल्या, “वगसम्राट दादू इंदुरीकर हे एक विलक्षण व्यक्तिमत्व होते. त्यांच्या ‘गाढवाचे लग्न’ या नाटकाचे आम्ही साडेतीनशेहून अधिक प्रयोग केले आहेत. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित ही एकांकिका स्पर्धा अत्यंत स्तुत्य आहे.”
स्पर्धेची पार्श्वभूमी आणि आयोजन
स्पर्धेच्या प्रस्ताविकेत सुरेश धोत्रे यांनी सांगितले की, “तळेगाव दाभाडे हे सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध गाव असून दादू इंदुरीकर, गो.नि. दांडेकर, शंकरराव परांजपे यांसारख्या व्यक्तींनी या परंपरेला बळ दिले आहे.”
या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत ४०० हून अधिक कलाकारांनी सहभाग घेतला.
स्पर्धेचे संयोजन सचिव संजय वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तानाजी मराठे, नितीन खळदे, डॉ. मिलिंद निकम, राजेश बारणे, अमित बांदल, प्रा. अशोक जाधव, बसप्पा भंडारी आदींनी केले.
महिला मंचच्या मीरा बेडेकर यांनी समई सजावट केली. कार्यक्रमाच्या आयोजनात ज्योती गोखले, शुभांगी देशपांडे, नयना डोळस, अरुंधती देशपांडे, सीमा जोशी, अपर्णा कवडे यांच्यासह अनेक महिला सदस्यांनी परिश्रम घेतले.
प्रकाशयोजना गजानन वटाणे व सुनील हवालदार यांनी केली.
कार्यक्रमाची सांगता डॉ. मीनल कुलकर्णी यांच्या ‘नटराज श्लोक’ आणि सुषमा इखे यांच्या ‘पसायदान’ ने झाली.
सूत्रसंचालन आकाश थिटे, तर आभार प्रदर्शन अपर्णा महाजन यांनी केले.
इतर पारितोषिकांचा निकाल
दिग्दर्शन प्रथम: ‘नाटेक’ — बद्रीश कट्टी व महेश धायगुडे
दिग्दर्शन द्वितीय: ‘वामन आख्यान’ — अनिकेत खरात, विराज दिघे
अभिनय पुरुष प्रथम: सागर यादव (तुका शेवट तितका गंभीर नाही)
अभिनय पुरुष द्वितीय: पवन पोटे (काही प्रॉब्लेम ये का?)
अभिनय पुरुष उत्तेजनार्थ: विराज दिघे (वामन आख्यान), सर्वायू ढेमसे (उंच), ऋषिकेश सुतार (मृत्यू मोनी डॉट कॉम)
अभिनय महिला प्रथम: राखी गोरखा (पिसाळा)
अभिनय महिला द्वितीय: केतकी भांडवलकर (वामन आख्यान)
अभिनय महिला उत्तेजनार्थ: स्नेहल पाटील (यथा प्रजा तसे राजा), अनघा बोरसे (सेकंड इनिंग), स्नेहल गुणकी (तुती)
नेपथ्य प्रथम: कोमल पाटसकर व मंगेश विधाते (नाटेक)
नेपथ्य द्वितीय: गणेश जाधव व कार्तिकी रेखाडे (जनावर)
प्रकाशयोजना प्रथम: निखिल मारणे (नाटेक)
प्रकाशयोजना द्वितीय: प्रवर अवते (मृत्यू मोनी डॉट कॉम)
पार्श्वसंगीत प्रथम: अभिजीत पटवर्धन व दिप्तेश ढेकळे (वामन आख्यान)
पार्श्वसंगीत द्वितीय: अर्णव जावळे (उमज)
लेखन पारितोषिक: अक्षय संत (नाटेक)






