स्त्रीवर्गाला मानसन्मानाची वागणूक द्यावी -रूपाली चाकणकर चांबळी येथे मीना शेंडकर व अंजना कामठे यांचा पीएचडी सन्मान सोहळा
पुरंदर दि. ३१ आजही समाजात स्त्रियांवरील अत्याचाराची मालिका चालू आहे. हुंडाबळी, कौटुंबिक हिंसाचार, सामूहिक बलात्कार सुरूच आहेत. हे रोखायचे असेल तर समाजातील प्रत्येक घटकांनी पुढे येऊन रूढी ,परंपरा यांना फाटा देत स्त्री सबलीकरणाच्या लढ्याला साथ दिली पाहिजे. भ्रूणहत्या टाळून स्त्री जन्माचे स्वागत करा. विधवा महिलांना सन्मानपुर्वक वागणूक द्या. निराधार, परितक्त्या घटस्फोटीत महिलांना आधार द्या. मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष ठेवा. समाजाने स्त्रीवर्गाला मानसन्मानाची वागणूक द्यावी असे आवाहन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केले.
चांबळी( ता. पुरंदर ) येथे कोल्हापूर जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी डॉ. मीना दत्तात्रय शेंडकर व डॉ. अंजना विशाल कामठे यांनी सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठातून डॉक्टरेट पीएचडी पदवी मिळाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने रूपाली चाकणकर यांच्या हस्ते नागरी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. त्यावेळी चाकणकर बोलत होत्या.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष जालिंदर कामठे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे,पुणे जिल्हा भाजपा उपाध्यक्ष गंगाराम जगदाळे , पुणे जिल्हा परिषद सदस्य योगेश फडतरे,पर्वती विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी अध्यक्षा श्वेता होनराव- कामठे, निरा बाजार समितीचे संचालक वामनभाऊ कामठे,सरपंच प्रतिभा कदम ,मनोज शेंडकर ,दत्तात्रय शेंडकर , भाऊसाहेब कामठे,मंगेश कामठे, जगन्नाथ शेंडकर, शिवराम शेंडकर ,मनिषा कामठे ,भारती कामठे ,चैत्राली कामठे, अॅड.शुभदा शेंडकर ,सुचिता कामठे, सुरैय्या मुलाणी, कल्पना शेंडकर गंगाबाई कामठे आदीसह घांबळीकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची संकल्पना संजयआबा कामठे, शहाजी कामठे ,शिवाजी शेंडकर यांची होती. संयोजन पोपटआबा शेंडकर, मारुतीभाऊ कामठे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक म्हस्कु महाराज कामठे यांनी केले. सूत्रसंचालन मारुतीभाऊ कामठे , बाळासाहेब फडतरे ,मोहन जगताप,यांनी केले. आभार संजय शेंडकर यांनी मानले.
रूपाली चाकणकर पुढे म्हणाल्या,पतीच्या निधनानंतर विधवा महिलांना अनेक प्रश्न व समस्यांना सामोरे जावे लागते, परंतु त्या न डगमगता संसाराचा गाडा नेटाने हाकतात. जसे पत्नीला अर्धांगिनी म्हणतात तसे विधवांना पूर्णांगिनी म्हणावे यासाठी आपण शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा करणार आहे. चांबळी गावाला ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा आहे शहीद अशोक कामठे यांच्या पराक्रमाची परंपरा चांबळीकर ग्रामस्थांनी पुढे चालू ठेवावी.
या सन्मान सोहळ्याला विविध पक्ष, संस्था, संघटना व चांबळीकर ग्रामस्थांची अलोट गर्दी उसळली होती. सर्व उपस्थितांना यावेळी सुग्रास जेवणाची व्यवस्था आयोजकांच्या वतीने करण्यात आली होती अशी व्यवस्था चांबळी गावचे माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य उद्योजक संजयआबा कामठे यांनी दिली.