धर्माला द्वेषाचा पाया नसावा हे बाबा भारती यांचे विचार मौलिक : डॉ. श्रीपाल सबनीस लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानतर्फे ‌‘समग्र बाबा भारती‌’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धर्मनिरपेक्ष परंपरा जोपासण्याचे कार्य बाबा भारती यांनी पुढे नेले आहे. धर्माला द्वेषाचा पाया नसावा हा महान विचार बाबा भारती यांनी मांडला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. धर्मनिरपेक्ष विद्वानाच्या भूमिकेतून कर्मठवाद टिकत नाही तर लोककल्याणाचा धर्म टिकतो ही भूमिका बाबा भारती यांनी मांडल्याचे गौरवपूर्ण विचार त्यांनी व्यक्त केले.

पालि-मराठी भाषेचे पहिले शब्दकोशकार बाबा भारती यांच्या जन्मशताब्दीनिमित्त लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानतर्फे ‌‘समग्र बाबा भारती‌’ या पुस्तकाचे प्रकाशन आज (दि. 2) झाले. पुस्तकाचे प्रकाशन डॉ. सबनीस यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिदषेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रम झाला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती, ज्येष्ठ बौद्ध विचारवंत दि. वा. बागुल, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अशोक पगारिया, अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉ. भीमराव गायकवाड, अनिल सोनवणे, डॉ. संभाजी मलघे, रजनी उद्धव कानडे मंचावर होते. प्रास्ताविकात महेंद्र भारती यांनी पुस्तक निर्मितीविषयी माहिती सांगितली. महेंद्र भारती, उद्धव कानडे, डॉ. संभाजी मलघे यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे.

Advertisement

बौद्ध धर्माची मांडणी भारती यांनी सोप्या सुलभ मराठी भाषेत जनसामन्यांपर्यंत पोहोचविली आहे, असे सांगून डॉ. सबनीस पुढे म्हणाले, बाबा भारती यांचे राष्ट्रभान व धर्मभान पक्के होते त्यातून त्यांनी अनेक धर्मांची तुलना केली. विविध धर्मातील दोष मांडले. गांधी-आंबेडकर वादही मांडला. परंतु भारती यांना विश्वभान महत्त्वाचे वाटल्याने धार्मिक अतिरेक विश्वाच्या एकात्मतेला मारक असल्याचा विचारही त्यांनी मांडला आहे. धर्माची दारे खुली करून भारती यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. वडिलांची वैचारिक पुण्याई पुढील पिढीपर्यंत पोहोचवत असल्याबद्दल सबनीस यांनी महेंद्र भारती यांचे अभिनंद केले.

दि. वा. बागुल म्हणाले, बाबा भारती यांचे साहित्य मोलाचे असून बुद्धांच्या वंदना मराठी भाषेत आणण्याचे महान कार्य त्यांनी केले आहे. धम्म सुरस आणि सोप्या मराठीत आणण्यात बाबा भारती यांचा मोलाचा वाटा आहे.

अशोक पगारिया म्हणाले, बाबा भारती यांचे साहित्य, मौलिक विचार समाजासमोर आणण्याचे कार्य या पुस्तकाच्या माध्यमातून झाले आहे.

लोकशिक्षक बाबा भारती यांच्या नावे समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल डॉ. भीमराव गायकवाड, बाबा कांबळे, आनंदा कांबळे, सूर्यकांत तिवडे, राजकुमार कांबळे, शंकर कांबळे, विक्रांत कांबळे, प्रकाश परांजपे, भाऊसाहेब कांबळे, सचिन कांबळे, विजय कांबळे, सुरेश देशमुख, प्रकाश कांबळे, सतिश केकनीस यांचा गौरव करण्यात आला. पुरस्कारप्राप्त व्यक्तींपैकी सूर्यकांत तिवडे, शंकर कांबळे, आनंदा कांबळे, सतिश केकनीस यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांच्याशी पुरुषोत्तम सदाफुले यांनी संवाद साधला.

मान्यवरांचे स्वागत निमिष भारती यांनी केले. सूत्रसंचालन सीमा गांधी यांनी तर आभार डॉ. संभाजी मलघे यांनी मानले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page