लोकसंस्कृतीत अभिजात भाषेचा प्रवास शोधावा लागतो. डॉ. अविनाश आवलगावकर
तळेगाव दाभाडे:
“ज्याला निर्माता नाही, करता नाही, दिग्दर्शक नाही, नेपथ्यकार नाही अशा लोकसाहित्याने मराठी भाषा समृद्ध केली आहे. विधीनाट्यमागे अध्यात्मबरोबर आनंद घेणे ही भूमिका होती. आपल्याला खऱ्या अर्थाने लोकसंस्कृती व्यवस्थेत अभिजात भाषेचा प्रवास शोधावा लागतो. अभिजात मराठी भाषेचा इतिहास हा लोकभाषेत शोधावा लागतो.” असे गौरव उद्गार अमरावती रिद्धपूर येथील पहिल्या मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर यांनी काढले. ते काल साहित्य अकादमी आणि इंद्रायणी महाविद्यालय
तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित यशोदा महादेव काकडे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये
‘ लोकरंगभूमी आणि अभिजात मराठी भाषा’ या विषयाच्या अनुषंगाने आयोजित एक दिवशीय परिसंवादात उद्घाटक म्हणून बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर मुंबईच्या साहित्य अकादमी प्रादेशिक कार्यालयाचे प्रभारी ओम प्रकाश नायर, सुप्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक पद्मश्री वामन केंद्रे, लोकसाहित्याचे अभ्यास डॉ. प्रकाश खांडगे, साहित्य अकादमीच्या केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सदस्य पानिपतकार विश्वास पाटील, लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. अनिल सहस्रबुद्धे, प्रभाकर ओव्हाळ गणेश चंदनशिवे, सोपान खुडे, मुकुंद कुळे, संतोष शेणई, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलगे, कार्यवाह श्री. चंद्रकांत शेटे, विविध महाविद्यालयातील प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे आवलगावकर म्हणाले, ” भाषेचे मूळ शोधणे अवघड आहे. लोकसाहित्याच्या आदिम व्यवस्थेमध्ये मराठी भाषेचे मूळ शोधता येते. मराठी लोकसाहित्य हेच मूळ साहित्य आहे. आदिम जमातीचे नृत्य हे लोकनरंगभूमीचे पहिले पाऊल आहे. कीर्तन परंपरेचं लोकनरंगभूमीशी जुनं नातं आहे. विधिनाट्यामागे धार्मिकता होती. मात्र लोकनरंगभूमीमागे मनोरंजन हा देखील उद्देश आहे. सगळ्या कलांची भूमिका ही लोकभाषा आहे. अभिजात मराठी भाषेचा इतिहास हा लोकभाषेत शोधावा लागतो.”
गणेश चंदनशिवे यांनी गायलेल्या महाराष्ट्र गीताने परिसंवादास सुरुवात झाली. साहित्य अकादमीच्या मुंबईतील प्रादेशिक कार्यालयाचे प्रभारी अधिकारी ओम प्रकाश नागर यांनी साहित्य अकादमीची भूमिका विशद करून स्वागत केले. इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलगे यांनी साहित्य अकादमी आणि इंद्रायणी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ लोकरंगभूमी आणि अभिजात मराठी भाषा’ या विषयाच्या अनुषंगाने आयोजित चर्चासत्रामागील भूमिका प्रास्ताविकात केली.
आपल्या अध्यक्षीय मनोगतातध्ये पानिपतकार विश्वास पाटील पुढे म्हणाले कि, पारंपरिक तमाशात बदल करून स्थळ, काळाचा स्वर लोककलाकारांनी पकडला पाहिजे. कुठलीही कला ही स्थळ, काळाचा नव स्वर जोपर्यंत पकडत नाही, तोपर्यंत ती जिवंत राहू शकत नाही.
लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे यांनी आपल्या बीजभाषणात, ” अभिजात मराठी भाषेला ऊर्जा देण्याचे काम बोलीभाषा करतात. लोकनरंगभूमीवरील अभिजात मराठी भाषा ही उत्स्फूर्त, पारंपरिक, लवचिक, प्रवाही बोलीभाषा असते. प्रमाण भाषेपेक्षा ती वेगळी असते. रंगभूमीला साचलेपण नसतं. ती स्थलकालपरत्वे बदलते. अभिजात भाषेने अजूनही बोलीभाषांना गावकुसाबाहेर ठेवले आहे.”
नाट्य दिग्दर्शक वामन केंद्रे म्हणाले कि, ” लोकनरंगभूमीवरील भाषेची क्षमता ही नाटक आणि सिनेमा पेक्षा वेगळी असणे हेच तिचे बलस्थान आहे. हर्ष, काव्य, सौंदर्याची अनुभूती देणारी कायमस्वरूपी मनावर कोरली जाते ती सर्वोच्च रंगभाषा होय.
पहिल्या सत्रात पत्रकार मुकुंद कुळे यांचे ‘ विधिनाट्याची रंगभाषा आणि अभिजात मराठी’ तसेच संतोष शेणई यांचे वभक्तिनाट्याची रंगभाषा आणि अभिजात मराठी’ या विषयावर निबंध वाचन झाले. अध्यक्षस्थानी अनिल सहस्त्रबुद्धे होते.
दुसऱ्या सत्रामध्ये प्रभाकर ओव्हाळ यांचे ववगनाट्याची रंगभाषा आणि अभिजात मराठीव, सोपान खुडे यांचे ‘ लोकनाट्याची रंगभाषा आणि अभिजात मराठी’ आणि गणेश चंदनशिवे यांचे ‘ तमाशाची रंगभाषा आणि अभिजात मराठी’ या विषयावर शोध निबंध सादर करण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉ. प्रकाश खांडगे होते.
प्रा. सत्यजीत खांडगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य संदीप भोसले यांनी आभार मानले. साहित्य अकादमी आणि इंद्रायणी महाविद्यालयाच्या प्राध्यापकवर्गाने या परिसंवादाचे नियोजन केले. यावेळी विविध महाविद्यालयातील प्राध्यापक संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.