इंद्रायणी महाविद्यालयात गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता व वृक्षारोपण उपक्रम संपन्नराष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने उपक्रम उत्साहात राबविण्यात आला
मावळ :

इंद्रायणी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालय तसेच कृष्णराव भेगडे फार्मसी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या अनुषंगाने राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने स्वच्छता व वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालय परिसर व खेळाच्या मैदानात स्वच्छता अभियानाने झाली. NSS स्वयंसेवकांनी परिसर स्वच्छ करून स्वच्छतेचा संदेश दिला. त्यानंतर वृक्षारोपण उपक्रम राबवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांनी एकात्मतेने सहभाग घेत पर्यावरण रक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.
प्रा. आर. आर. डोके सर यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या विचारांवर प्रकाश टाकताना ग्रामीण विकास, शेतकरी आणि जवानांचे योगदान यावर भर दिला. त्यांनी “खेड्याकडे चला” व “जय जवान, जय किसान”या घोषवाक्यांची आठवण करून दिली.
कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एस.पी.भोसले सर यांनी विद्यार्थ्यांना शिस्तबद्ध व विचारशील जीवनशैलीचे महत्त्व पटवून दिले. तर फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय आरोटे यांनी **स्वच्छता आणि पर्यावरण रक्षणाची शपथ देऊन दोन्ही थोर नेत्यांना अभिवादन** केले.
या कार्यक्रमात प्रा. कृष्णा मिटकर, प्रा. विना भेगडे, प्रा. के. डी. जाधव, प्रा. जगताप, डॉ. गुलाब शिंदे, प्रा. प्रियांका रोकडे, प्रा.मंजू कारंडे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
सूत्रसंचालन प्रा. सुरेश देवढे (NSS कार्यक्रम अधिकारी) यांनी केले, तर आभारप्रदर्शन प्रा. कृष्णा मिटकर यांनी मानले.
या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता, पर्यावरण रक्षण आणि सामाजिक जबाबदारीबाबत जागरूकता निर्माण झाल्याचे आयोजकांनी सांगितले. या उपक्रमाचे इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रामदास काकडे, कार्यवाह मा.श्री. चंद्रकांत शेटे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संभाजी मलघे यांनी विशेष कौतुक केले.






