डॉ. सुरेश थरकुडे यांना खो-खो क्रीडाकार्यमान विषयात कॉपीराईट प्राप्त
मावळ :
“खो-खो स्पॅटीयल झोन अँड परफॉर्मन्स ॲनॅलिसिस ऑफ ॲटॅकर, डिफेंडर अँड टीम” या अभिनव आणि संशोधनात्मक विषयावर डॉ. सुरेश थरकुडे यांना प्रतिलिप्याधिकार कार्यालय, भारत सरकार यांच्या मार्फत कॉपीराईट प्राप्त झाले. यामुळे खो-खो मध्ये क्रीडा कार्यमान विश्लेषणाला नवीन दिशा मिळण्यास मदत होणार आहे. खेळाडूंच्या वैयक्तिक आणि संघात्मक कामगिरीत सुधारणा करण्यासाठी हे संशोधन मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
या संशोधनामध्ये खो-खो खेळातील आक्रमक, संरक्षक तसेच संपूर्ण संघाच्या कामगिरीचे स्पॅटीयल (Spatial) झोन नुसार कौशल्याचे सखोल विश्लेषण करण्यास मदत होणार आहे. खो-खो खेळादरम्यान खेळाडूंच्या हालचाली, रणनीती, विशिष्ट झोनचा वापर आणि परफॉर्मन्स यांचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास या संशोधनात मांडण्यात आला आहे.
हे संशोधन प्रशिक्षक, खेळाडू, क्रीडा शास्त्रज्ञ आणि क्रीडाप्रेमींसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. खेळाडूंची तसेच संघाची साख्यिकी माहिती आकडेवारीच्या स्वरुपात उपलब्ध झाल्यामुळे कौशल्य प्रशिक्षण पद्धती, तंदुरुस्ती प्रशिक्षण पध्दती, संपुर्ण स्पर्धेचे, संघाविरूध्दचे तसेच विशिष्ट खेळाडू विरुध्दचे डावपेच- रणनीती अधिक प्रभावी बनविण्यासाठी मार्गदर्शक ठरेल. आधुनिक तंत्रज्ञान आणि परफॉर्मन्स अॅनालिसिसचा वापर करून खो-खो खेळाच्या अभ्यासाला नवीन शास्त्रीय दृष्टिकोन यामुळे प्राप्त झाला आहे.
डॉ. सुरेश थरकुडे यांच्या या महत्त्वपूर्ण संशोधनाला कॉपीराईट मिळाल्यामुळे खो-खो खेळाच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्राला नवीन आयाम प्राप्त झाले आहेत. भारतीय पारंपरिक खेळांना शास्त्रीय चौकट देउन जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.






