इंद्रायणी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मिळणार स्पर्धा परीक्षेबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन
तळेगाव दाभाडे, दि. १२ :
तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी विद्यामंदिर व जिज्ञासा एक्सलन्स अकॅडमी प्रशिक्षण संस्थेच्यावतीने मावळ तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी व मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.
याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे, प्राचार्य संभाजी मलघे व जिज्ञासा संस्थेचे संचालक सुधीर राऊत यांनी ही माहिती दिली.
चंद्रकांत शेटे यांनी सांगितले, की स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इंद्रायणी महाविद्यालय परिसरात आधुनिक डिजिटल सुविधांनी युक्त क्लासरूम, कॉम्प्युटर लॅब, संदर्भ ग्रंथ आणि नियतकालिकांनी परिपूर्ण असलेले वाचनालय इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेने उपलब्ध करून दिले आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जिज्ञासा एक्सलन्स अकॅडमी अनुभवी शासकीय अधिकारी आणि प्राध्यापक उपलब्ध करून देणार आहे.
प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी सांगितले, की केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याद्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी तयारी करून घेतली जाईलच. शिवाय बँकिंग, स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड यांच्याद्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांच्या तयारीसाठी देखील मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रति आठवड्याला विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षा देखील घेतल्या जातील. जेणेकरून विद्यार्थ्यांचा या परीक्षांसाठी नियमित सराव होईल.
सुधीर राऊत यांनी सांगितले, की अलीकडच्या काळात स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि आयबीपीएस द्वारे अनुक्रमे २४०० आणि ४००० एवढ्या अधिकारी व कर्मचारी, तसेच अप्रेंटिस यांच्या जागा भरतीसाठी जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत. त्याचप्रमाणे विविध राष्ट्रीयकृत बँका, इन्शुरन्स कंपन्या, रिझव्हे बैंक ऑफ इंडिया आणि रेल्वेतील बिगर तांत्रिक पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती होणे अपेक्षित आहे. या सर्व पदांसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येऊन त्यांची संपूर्ण तयारी करून घेण्यात येणार आहे.
यासाठी इंद्रायणी महाविद्यालयाच्या अनुभवी प्राध्यापक वर्ग, इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांचे सहकार्य लाभले आहे.