*इंद्रायणी महाविद्यालयात “राष्ट्रीय विज्ञान दिन” उत्साहात साजरा*
तळेगाव दाभाडे :
इंद्रायणी महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ विज्ञान विभागाकडून राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध शैक्षणिक आणि प्रयोगशील उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अरविंद शाळिग्राम उपस्थित होते. डॉ. शाळिग्राम हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘रिसर्च पार्क फाउंडेशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील एक महत्त्वपूर्ण शैक्षणिक आणि प्रशासकीय व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक म्हणून कार्य केले आहे.
डॉ. शाळिग्राम यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाचे महत्त्व पटवून देत नवीन संशोधन व वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचे आवाहन केले. आपल्या देशात विज्ञानाच्या प्रगतीसाठी आपण सर्वांनी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवावा, प्रयोगशीलता वाढवावी आणि नवीन शोध-उपलब्धींसाठी प्रयत्न करावेत. तरच भारत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अजून पुढे जाईल असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमादरम्यान सर्वांचे स्वागत प्राध्यापक श्री. उत्तम खाडप यांनी केले व प्रमुख पाहुण्यांची ओळख डॉ. रोहित नागलगाव यांनी करून दिली.
कार्यक्रमा दरम्यान कनिष्ठ विभागातील विद्यार्थ्यानी विज्ञान प्रदर्शन, पोस्टर स्पर्धा, वैज्ञानिक प्रकल्प सादरीकरण केले. तसेच वरिष्ठ विभागातील विद्यार्थ्यानी
वैज्ञानिक रांगोळी, रसायनशास्त्राचे मनोरंजक प्रयोग, सूक्ष्मजीवशास्त्राचे प्रात्यक्षिके, भौतिकशास्त्र व गणित विषयावर आधारित वैज्ञानिक खेळ, प्रश्नमंजुषा यांचे आयोजन केले होते व तसेच “रामन इफेक्ट” लघुचित्रपट दाखविण्यात आला. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्ताने आयोजित करण्यात आले या कार्यक्रमात ८०० हुन अधिक विद्यार्थ्यानी सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृष्णराव भेगडे फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय आरोटे होते. त्यांनी इंद्रायणी विदया मंदिर संस्थेच्या अंतर्गत विज्ञान शाखेच्या माध्यमातून राबविण्यात येणारे विविध अभ्यासक्रम व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्याना भविष्यातील विविध संधीबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल सर्वांचे कौतुक करत सर्वांना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आभार उपप्राचार्य श्रीं संदीप भोसले यांनी मानले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. दीप्ती कान्हेरीकर व सौ. प्राची भेगडे यांनी केले.
संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन कनिष्ठ व वरिष्ठ विज्ञान विभागातील प्राध्यापकांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांना मार्गदर्शन केले व भविष्यातही असेच उत्तमोत्तम कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी सर्वांना प्रोत्साहीत केले. इंद्रायणी विदया मंदिर संस्थेचे अध्यक्ष श्री. रामदास काकडे व कार्यवाह श्री. चंद्रकांत शेटे यांनी कार्यक्रमासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.