इंडिगोच्या उड्डाण रद्दप्रकरणी मावळ मधील गुलाब उत्पादक शेतकरी संकटात
मावळ:
मावळ परिसरातील गुलाब उत्पादक शेतकऱ्यांवर इंडिगो एअरलाइन्सच्या नेटवर्कमधील मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेल्या अडथळ्यांचा गंभीर फटका बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक उड्डाणे रद्द होत असल्याने गुलाबफुलांच्या वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. मावळ तालुक्यातील गुलाब उत्पादक शेतकऱ्यांचे पाच दिवसांत तब्बल ५० लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.
मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात गुलाबफुलांची शेती केली जाते. येथे पिकणारी फुले देशातील विविध राज्यांसह विदेशातही निर्यात केली जातात. दररोज देशांतर्गत साधारण ४० लाख गुलाबफुलांची वाहतूक केली जाते. त्यापैकी सुमारे २५ टक्के म्हणजेच १० लाख फुलांची वाहतूक विमानांद्वारे होते. मात्र, इंडिगोच्या उड्डाणांमध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक आणि नेटवर्कमधील अडचणींमुळे अनेक विमानतळांवर उशिर व रद्दीकरणाचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे.
या गोंधळाचा सर्वाधिक फटका गुलाबफुलांच्या वाहतुकीला बसला असून, ताजेपणा टिकवण्यासाठी अत्यंत कमी वेळ उपलब्ध असतानाच फुले तासन्तास विमानतळांवर अडकून राहत आहेत. परिणामी ही फुले बाजारात वेळेवर पोहोचत नसल्याने त्यांची झपाट्याने कुजण्याची शक्यता वाढली आहे. किरकोळ बाजारपेठेत गुलाबाच्या एका फुलाची किंमत साधारण २० रुपये असते. वाहतूक ठप्प झाल्याने रोजचे साधारण १० लाख फुले बाजारात न पोहोचल्यानं शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे.
दरम्यान, लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने फुलांची मागणी प्रचंड असते. मात्र पुरवठा खंडित झाल्याने व्यापारी आणि शेतकरी दोघेही चिंताग्रस्त आहेत. या नुकसानाची भरपाई कोण करणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शेतकऱ्यां मधुन तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.






