कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये कचरा व्यवस्थापन जनजागृती अभियान
तळेगाव दाभाडे :

तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलित कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूल येथे स्वच्छ महाराष्ट्र मिशन (२.०) अंतर्गत नागरी अभियानाच्या माध्यमातून कचरा व्यवस्थापन या विषयावर प्रभावी जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर सौ. भावना पारधे यांनी उपस्थितांचे मनःपूर्वक स्वागत केले. या प्रसंगी संस्थेच्या संचालिका सौ. गौरी काकडे मॅडम, शाळेच्या मुख्याध्यापिका मिस साईलक्ष्मी , उपमुख्याध्यापिका सौ. ज्योती सावंत , शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमासाठी श्री. विकास चव्हाण (समन्वयक), सौ. अमृता जगदाळे मॅडम, कु. अंकिता मॅडम व श्री. श्रीकांत सर हे मान्यवर उपस्थित होते. त्यांचा सन्मान संस्थेच्या संचालिका सौ. गौरी काकडे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या वयोगटाचा विचार करून इयत्ता १ ते ४ व इयत्ता ५ ते १० अशा दोन स्वतंत्र सत्रांचे आयोजन कृष्णाई सभागृहात करण्यात आले. उपमुख्याध्यापिका सौ. ज्योती सावंत मॅडम यांनी “स्वच्छता हिच सेवा” हा संदेश देत कचरा व्यवस्थापनाची जबाबदारी प्रत्येकाने प्रामाणिकपणे स्वीकारण्याचे आवाहन केले.
या सत्रांमध्ये कचऱ्याचे प्रकार, रंगीत कचरापेट्यांचे महत्त्व, कचरा वर्गीकरणाची पद्धत तसेच “कचरा कमी करा – पुनर्वापर करा – पुनर्निर्मिती करा” या त्रिसूत्रीवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सत्रे प्रात्यक्षिके, संवाद व कृतीशील उपक्रमांनी परिपूर्ण असल्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. योग्य उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू, प्रमाणपत्रे व डिस्पोजेबल पिशव्या देऊन प्रोत्साहित करण्यात आले.
कार्यक्रमाचा समारोप सौ. माधुरी गवस यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणारा ठरला असून, दैनंदिन जीवनात योग्य कचरा व्यवस्थापनाच्या सवयी अंगीकारण्यास विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली.






