गंहुजे मावळ : नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तरूणाचा बुडुन दुर्दैवी मृत्यू
गंहुजे (ता. मावळ) येथे मित्रांसोबत नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी घडली. देहूरोड थॉमस कॉलनी येथील रोहन रॉय (वय २०) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देहूरोड परिसरातील तिघे तरुण शनिवारी दुपारी एक वाजता गंहुजे येथील पवना नदी परिसरात पोहण्यासाठी गेले होते. त्यांच्यासोबत रोहन रॉय हा देखील होता. तिघेही नदीत उतरले असता नदीच्या मधोमध पोहत गेले.
दरम्यान, पाण्याची खोली लक्षात न आल्याने रोहन अचानक बुडाला आणि पाण्यात दिसेनासा झाला. सोबतच्या मित्रांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात यश आले नाही. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती शिरगाव-परंदवडी पोलिस ठाणे तसेच वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांना दिली.
सूचना मिळताच पोलिस पथक आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे स्वयंसेवक घटनास्थळी दाखल झाले. तब्बल तीन तासांच्या प्रयत्नांनंतर रोहनचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश आले.
या शोध मोहिमेत निलेश गराडे, गणेश गायकवाड, अनिश गराडे, राजू बांडगे, विनय सावंत, भास्कर माळी (मामा), कमलेश राक्षे, अनिल आंद्रे, हिरामण आगळे, आणि प्रतीक कुंभार यांनी सक्रिय सहभाग घेतला.
शिरगाव पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन वायसीएम रुग्णालय, पिंपरी येथे शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास परंदवडी पोलीस करीत आहेत.






