कामशेत–पवनानगर रस्त्यावर धोकादायक प्रवासी वाहतूक,पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह!
कामशेत: ग्रामीण भागात अवैध प्रवासी वाहतुकीने अक्षरशः कळस गाठला असून कामशेत–पवनानगर रस्त्यावर दररोज धोकादायक पद्धतीने प्रवास सुरू आहे.
जीप, रिक्षा आणि खाजगी वाहनांमध्ये मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी बसवून प्रवास केला जात आहे. ही खाजगी वाहतूक वाहतूक पोलिसांच्या नजरेसमोर सुरू आहे , तरीदेखील कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांकडून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
राज्य परिवहन मंडळाच्या बससेवेचे योग्य नियोजन नसल्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. कधी तीन-चार तास बस मिळत नाही, तर कधी एकाच तासात तीन-चार बस धावताना दिसतात. या अस्थिर बससेवेचा फायदा खाजगी प्रवासी वाहतूकदारांना होत आहे.
हेच खाजगी वाहन चालक वाहनांमध्ये प्रवाशांना टपावर, ड्रायव्हरच्या शेजारी, तसेच वाहनाच्या मागे उभे राहून १५ ते २० प्रवासी भरतात आणि धोकादायकरीत्या प्रवास करतात.
या संदर्भात नागरिकांकडून प्रशासनाकडे अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. वाहनचालक नियम मोडतात आणि प्रवाशांकडून नियमापेक्षा अधिक भाडे वसूल करतात, तरीही कोणतीही कारवाई न झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
अवैध प्रवासी वाहतुकीमुळे कामशेत–पवनानगर रस्त्यावर गंभीर अपघात होण्याची शक्यता असल्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.






