आमदार सुनील शेळके यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी दिली मावळच्या सर्वांगीण विकासाला गती* *आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने महत्त्वपूर्ण बैठक*
वडगाव मावळ, ३० मे — मावळ तालुक्यातील विविध प्रलंबित विकासकामांचा आढावा घेण्यासाठी (गुरुवारी) जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या दालनात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने झालेल्या या बैठकीत तालुक्यातील नागरी व सामाजिक प्रश्नांवर सखोल चर्चा झाली.
बैठकीत भांगरवाडी येथील पूल प्रकल्प, अनुकंपा तत्वावरील नोकऱ्या, भाजी मंडईचे काम, घरकुल योजना, मागासवर्गीय मुलींसाठी वसतीगृह, आदिवासी विद्यार्थ्यांचे वसतीगृह तसेच अभ्यासिकेच्या प्रकल्पावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या सर्व कामांमध्ये अडथळा येत असल्याने त्यावर उपाययोजना सुचवण्यात आल्या.
जिल्हाधिकारी डुडी यांनी उपस्थित संबंधित अधिकाऱ्यांना कामांची प्रगती निश्चित वेळेत पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. प्रशासनातील विलंब, निधी वितरणातील अडचणी आणि भूसंपादन प्रक्रियेतील समस्या दूर करण्यावर भर देण्यात आला.
या बैठकीला विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये प्रशासन अधिकारी व्यंकटेश दुर्वास, सहाय्यक संचालक अभिजीत केतकर, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रसाद खैरनार, भूसंपादन अधिकारी विजय फुलपगारे यांच्यासह तळेगाव, वडगाव, देहू आणि लोणावळा येथील मुख्याधिकारी व संबंधित विभागांचे अधिकारी सहभागी झाले होते.
तालुक्यातील नागरिकांच्या दीर्घकालीन अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून ही बैठक अत्यंत फलदायी ठरली असून येत्या काळात मावळच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक पावले उचलली जातील, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.