धार्मिक स्थळांवर लगेचच कारवाई नाही आयुक्त शेखर सिंह यांचे आश्वासन – राहुल डंबाळे मदरसा, मस्जिद ॲक्शन कमिटीच्या प्रतिनिधींची आयुक्तांसमवेत समवेत बैठक संपन्न

SHARE NOW

पिंपरी, पुणे (दि. १३ मे २०२५) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कुदळवाडी, चिखली परिसरातील अनधिकृत मंदिर, मस्जिद, मदरसा व इतर धार्मिक स्थळांना अतिक्रमण बाबत नोटीस दिली आहे. या बाबत मदरसा, मस्जिद ॲक्शन कमिटीच्या वतीने आक्षेप घेण्यात आला होता. तसे पत्र समन्वयक राहुल डंबाळे आणि प्रतिनिधींनी आयुक्त शेखर सिंह यांना दिले होते. याविषयी मंगळवारी (दि.१३) आयुक्त शेखर सिंह यांच्या दालनामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. मा. सर्वोच्च न्यायालय व राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन मनपाने करावे. तसेच आक्षेप घेण्यात आलेल्या व प्राप्त झालेल्या पत्रांवर सुनावणी घेण्यात यावी अशी मागणी यावेळी आयुक्तांकडे करण्यात आली.

या बैठकीस ॲक्शन कमिटीचे समन्वयक राहुल डंबाळे, फजल शेख, अजीज शेख, शहाबुद्दीन शेख, नियाज सिद्दीकी, बाळासाहेब भागवत, बाबा कांबळे, गुलजार शेख, युसुफ कुरैशी, मौलाना नय्यर नुरी, कारी इक्बाल उस्मानी, सय्यद गुलाम रसुल, याकुब शेख, रशिद सय्यद, शक्रुल्ला पठाण, वाहीद कुरैशी, पोलीस उपायुक्त शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे आदी उपस्थित होते.

Advertisement

या बैठकीनंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना समन्वयक राहुल डंबाळे व शहाबुद्दीन शेख यांनी सांगितले की, आयुक्त शेखर सिंह यांनी या बैठकीत सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आले की, सर्व मशिदी, मदरसे हे खाजगी जागेवर असून त्या राज्य शासनाच्या धोरणानुसार नियमित होण्यास पात्र आहेत. तशी कार्यवाही कमिटीच्या वतीने सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे ही धार्मिक स्थळे अधिकृत करून द्यावी अशी विनंती केली. राज्य शासनाने यापूर्वीच छत्रपती, कोल्हापूर, मीरा-भाईंदर, मुंबई, नागपुर आदी महानगरपालिका क्षेत्रांमधील हजारो धार्मिक स्थळे नियमित केल्याची बाब आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यानंतर या सर्व बाबींची सविस्तर माहिती घेऊन जी धार्मिक स्थळे नियमानुकूल होणे शक्य असेल त्यांच्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन आयुक्तांनी शिष्टमंडळास दिले आहे अशी माहिती डंबळे यांनी दिली.

इतर महापालिकांप्रमाणे धार्मिक स्थळे नियमित करण्यासाठी प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे मत यावेळी शिष्टमंडळातील सर्वच पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. दरम्यान महानगरपालिकेने एकतर्फी कारवाई केल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी भीती देखील यावेळी व्यक्त केली. भारत-पाक युद्धाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन शहरांमध्ये अन्य कोणताही तणाव निर्माण होऊ नये या पार्श्वभूमीवर ही कारवाई रद्द करावी अशीही विनंती करण्यात आली होती. दरम्यान नोटीस दिलेल्यांपैकी पाच मशिदींना छत्रपती संभाजी नगर येथील वक्फ ट्रीब्युनल बोर्डाने मनपाने कारवाई करण्यास स्थगिती आदेश दिलेले आहेत हे देखील आयुक्त शेखर सिंह यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. याविषयी शहर अभियंता मकरंद निकम यांच्याशी पुढील कामाबाबत समन्वय साधण्यात यावा असेही आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले असल्याचे शहाबुद्दीन शेख यांनी सांगितले.

———————————-


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page