नगर परिषदेच्या शाळांची विक्रमी कामगिरी-
तळेगाव दाभाडे :
नगर परिषद शिक्षण मंडळाच्या दोन्ही माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यंदा विक्रमी गुणसंपादन केले आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राबविण्यात आलेल्या प्रकल्पामुळे हे यश मिळाल्याचे शिक्षकांनी सांगितले. शंभर टक्के निकाल लागलेल्या नगर परिषदेच्या माध्यमिक विद्यालय क्र. 2 मधील 61 पैकी सर्व परीक्षार्थी विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नेत्रा किसन दळवी हिने 86.20 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. तर रजनी अखिलेंद्र चौरसिया(81 टक्के) आणि फिरदौस चॉंदबाबा शेख(80.80 टक्के) यांनी दुसरा व तिसरा क्रमांक प्राप्त केला. मुख्याध्यापक वर्षा थोरात-काळे यांनी यशस्वी मुलांचे कौतूक करुन विषय शिक्षकांसह पालकांचेही अभिनंदन केले.
नगर परिषदेच्या पीएम श्री संत ज्ञानेश्वर शाळा क्र. 6 चा निकाल 93.24 टक्के लागला. विजय संजय लोहगावकर याने 91.41 टक्के गुण मिळवून पहिला नंबर पटकावला. दुस-या क्रमांकावर अनुष्का बाळू डामसे हिला 85.60 टक्के तर तृतीय क्रमांकावरील रेणू सेवालाल चौहान हिला 84 टक्के गुण मिळाले. मुख्याध्यापक वसुंधरा माळवदकर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.