भारतीय योग संस्थानचा 59वा वर्धापनदिन तळेगावात साजरा
तळेगाव दाभाडे :
बुध्दीची अस्थिरता हे असमाधानाचे कारण आहे. चित्तवृत्ती एकाग्र करणं आणि सैरऱभर होणारे मन पवित्र करुन बुध्दीला स्थीरता देणं ही योगामधील महत्त्वाचा पायरी आहे. योगसाधकांनी शरीरासाठी नाही, तर आत्मशुध्दीसाठी योगासन करण्याची मानसिकता धारण करावी, असे आवाहन संत साहित्याचे अभ्यासक तथा विचारवंत हभप नितीन महाराज काकडे यांनी केले.
भारतीय योग संस्थानच्या 59व्या वर्धापनदिन समारंभानिमित्त गुरुवारी (दि. 10) येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद शाळेच्या उपमुख्याध्यापक मनिषा दरेकर होत्या. इंद्रायणी सभागृहात झालेल्या कार्यक्रमास पंचक्रोशीतील योग साधक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. पहिल्या सत्रात योग प्रात्यक्षिके घेण्यात आली. यावेळी जिल्हामंत्री सुषमा कुलकर्णी, क्षेत्रमंत्री शारदा काळे व छाया नाझरकर, संघटनमंत्री पिराजी भोसले, क्षेत्रप्रमुख छबु पाठक, रोहिणी मराठे, केंद्रप्रमुख सिध्दार्थ कदम आणि उपप्रमुख ज्योती सातवे उपस्थित होते.
संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताबाई आणि संत तुकोबारायांच्या अभंगातील दाखले देत हभप नितिन महाराज काकडे यांनी योगाचे मानवी जीवनातील महत्व या विषयावर प्रबोधन केले. यम नियमापेक्षा प्राणायाम महत्वाचा आहे. योगाने भरकटणा-या चित्तरुपीचा विरोध करता येतो. त्यासाठी प्रथम मन चिंतन केलेल्या गोष्टींचं स्मरण करतं. चिंतन आणि स्मरणाला स्थिर करण्याचं काम बुध्दी करते. पण बुध्दी अस्थिर राहिली तर समाधान, सुख मिळणार नाही. योगाच्या माध्यमातून बुध्दी स्थिर करणे ही साधना असल्याचे ते म्हणाले.
यावेळी पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. साधक बाळकृष्ण झांबरे, महादेव पवार, गणपत गायकवाड, संजीवकुमार कांबळे, भगवान कांबळे, सुनील सोलसे यांच्यासह साधिका क्षमा फलटणे, माधुरी मराठे, मंजु झेंडे, मीना व्हटकर, आशा भोसले, बायडाबाई मराठे, शांताबाई फुले, आशा गायकवाड, संगीता मुनोत, शोभा उबारे, शरयू विचारे, सुप्रिया रासम, अश्विनी सुतार यांनी योगसाधनेची प्रात्यक्षिके सादर केली.
सिध्दार्थ कदम यांनी सूत्रसंचालन केले. पिराजी भोसले यांनी आभार मानले.